नवी दिल्ली-
सेन्सॉर बोर्डाने अडवलेल्या ‘एमएसजी: मेसेंजर ऑफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाला लवादानं मान्यता दिल्यानं संतापलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
डेरा सच्चा सौदा या कथित अध्यात्मिक संस्थानाचे प्रमुख व स्वयंघोषित संत गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांनी ‘एमएसजी’ हा चित्रपट बनवला आहे. स्वत: राम-रहीम यांची यात भूमिका आहे. रामरहीम देव असल्याचा प्रचार यात असल्याने तसेच अनेक चमत्काराची पेरणी असल्यानं सेन्सॉर बोर्डानं चित्रपटास आक्षेप घेतला होता. हा चित्रपट अंधश्रद्धा पसरवतो तसंच त्यामुळं धार्मिक भावना भडकू शकतात, असं मत नोंदवत बोर्डानं हा चित्रपट लवादाकडं पाठवला होता.
लवादानं या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर सॅमसन यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. ‘एमएसजीच्या प्रदर्शनाला मंजुरी मिळाल्याचं मी ऐकलं आहे. त्याबाबत अद्याप लेखी माझ्यापर्यंत काहीही आलेलं नाही. हा निर्णय म्हणजे सेन्सॉर बोर्डाची थट्टाच आहे. मी राजीनाम्याचा निर्णय सरकारला कळवला आहे,’ असं सॅमसन यांनी सांगितलं.
सेन्सॉरच्या कामात सरकारी हस्तक्षेप, दबाव आणि भ्रष्टाचार हे राजीनाम्याचं कारण असल्याचं सॅमसन यांनी सांगितलं.
‘एमएसजी’च्या मंजुरीत सरकारची कोणतीही भूमिका नाही. सेन्सॉरच्या कामात सरकारच्या कोणत्याही व्यक्तीनं हस्तक्षेप केलेला नाही किंवा कोणताही दबाव आणलेला नाही. लीला सॅमसन यांचं तसं म्हणणं असेल तर त्यांनी पुरावा द्यावा,’ असं माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितलं. ‘सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सदस्यांची नियुक्ती मागील सरकारच्या काळात झालेली आहे. आम्ही एकही नवा सदस्य नेमलेला नाही, असं ते म्हणाले. याउलट, लीला सॅमसन या अध्यक्षपदाची जबाबदारी गांभीर्यानं पार पाडत नव्हत्या. गेल्या काही महिन्यांत त्या फक्त एकदाच कार्यालयात आल्या होत्या, अशी आमची माहिती असल्याचंही राठोड यांनी स्पष्ट केलं.
पंजाबमध्ये ‘एमएसजी‘वर बंदी
चित्रपट लवादानं एमएसजीला हिरवा कंदील दिल्याचे वृत्त असले तरी पंजाबमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. पंजाबमधील चित्रपटगृहांनी एकमतानं हा निर्णय जाहीर केला आहे.