पुणे – स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत नागरिकांच्या सहभागाकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तळागाळापर्यंतच्या सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत जाऊन स्मार्ट सिटी अभियानाबाबत माहिती सांगून शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांची मते जाणून घेण्याकरिता व फॉर्म भरुन घेण्याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन उपायुक्त (विशेष) अनिल पवार यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे शहरातील सुमारे ६८ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सहभागी विद्यार्थी आज कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अनिल पवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत नागरिकांपर्यंत जाऊन विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती देणे तसेच नागरिकांकडून फॉर्म भरुन घेणे याबाबतील त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंका, विविध प्रश्नासंदर्भातही त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख श्री. संजयकुमार दळवी, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाचे प्रा. संदीप राऊत, जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. शिवाजी पाचारणे व अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी संजय गायकवाड, विनोद क्षिरसागर, जगदीश खानोरे, मंगेश दिघे, प्रदीप आव्हाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.
तसेच सहकारनगर परिसरातील राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग या शाळेतील नाट्यगृहात मनपा तसेच खाजगी शाळांचे मुख्याध्यापकांकरिता स्मार्ट सिटी अभियानाबाबत माहिती देणेकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनिल पवार, उपायुक्त (वि) यांनी स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांचा स्मार्ट सिटीत सहभाग
कोथरुड येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुणे महापालिकेस भेट देऊन स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत माहिती घेतली.
पुणे महानगरपालिकेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकी प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) मा. ओमप्रकाश बकोरिया यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजा संदर्भात तसेच शहरातील विविध प्रकल्प, विकास योजना व स्मार्ट सिटी अभियाना संदर्भात माहिती सांगितली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी घनकचरा व्यवस्थापन संदर्भात सविस्तर माहिती सांगितली.
स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी बैठकीप्रसंगी आपले फॉर्म्स भरले व या अभिनव योजनेत सहभागी होण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी मनपातील भाजप सभासद मा. अशोक येनपुरे तसेच एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मधील प्रा. मनीष केळकर, प्रा. गिरीजा लगड व अन्य अधिकारी उपस्थित होते.