पुणे – वीजग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी नव्याने लोकपाल आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत असून, जिल्हास्तरावरील तक्रारींचे निवारण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती विद्युत लोकपाल (मुंबई) आर. डी. संखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तक्रारी सोडविण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण कक्ष (आयजीआरसी), ग्राहक तक्रार निवारण मंच (सीजीआरएफ) आणि विद्युत लोकपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश नागरिकांना याविषयीची पुरेशी माहिती नसते. त्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
संखे म्हणाले, “”वीजबिलावर आयजीआरसी, सीजीआरएफकडे संपर्क कसा साधावा, याविषयीची माहिती दिलेली असते. ग्राहकांनी प्रथम त्यांच्याकडे जावे. साठ दिवसांच्या आत तक्रारींचे निराकरण झाले नाही, तर ते ग्राहक लोकपालकडे येऊ शकतात. राज्याकरिता मुंबई व नागपूर येथे दोन लोकपालची नियुक्ती झाली आहे. दाखल करायवयाचा अर्ज रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, किंवा ई-मेलद्वारे करता येऊ शकतो. याबाबतची माहिती www.mercombudsman.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.‘‘
“”मंचापुढे अथवा विद्युत लोकपालकडे सुनावणीदरम्यान ग्राहकास स्वतःची बाजू मांडण्याची तरतूद आहे. ग्राहकास वकिलाची नेमणूक करता येत नाही. लोकपालकडे अर्ज दाखल केल्यास साठ दिवसांत तडजोड होणे अपेक्षित आहे. तक्रार दाखल झाल्यावर दीड महिन्यातच त्यांचे निवारण करण्यात येते. लोकपालचा निर्णय अंतिम आहे. परंतु ग्राहकास जर समाधान झाले नाही, तर त्यास आयोगाकडे अपील करता येत नाही. पण निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. गेल्या सहा महिन्यांत कोल्हापूर व सांगली (35) नाशिक (दोन), जळगांव (सात) पुणे (दहा) येथील ग्राहकांची प्रकरणे सोडविण्यात आली आहेत,‘‘असेही संखे यांनी सांगितले.