पुणे – २७व्या पुणे फेस्टीव्हलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत मुले आणि मुलींच्या
गटात पुण्याच्या संघांनी बाजी मारत विजेते पद मिळवले. अंतिम लढतील मुलांच्या गटात पुणे
संघाने कोल्हापूरचा ७ विरूद्ध १ असा तर मुलींच्या गटात सातारा संघावर ७ विरूद्ध ० अशी
दणदणीत मात करत पुणे संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. रोलबॉल या खेळाचा जन्म पुण्यात
झाला असून त्याला पहिल्या वर्षापासून पुणे फेस्टीव्हलने स्पर्धेचे पाठबळ दिले आहे.
कोथरूडच्या महेश विद्यालयात गेले दोन दिवस सुरू असलेल्या रोलबॉल स्पर्धेत मुलांच्या व
मुलींच्या गटात प्रत्येकी २५ जिल्हा संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र रोलबॉल
संघटनेचे अध्यक्ष वसंत राठी यांच्या हस्ते झाले होते. महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन तर्फे स्पर्धेचे
आयोजन गेली दहा वर्षे राजू दाभाडे हे पुणे फेस्टीव्हलमध्ये करत आहेत. विजेत्या संघांना पुणे
फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
यावेळी रोलबॉलच्या तांत्रिक समितीचे मिलिंद क्षीरसागर, सतीश घारपुरे, भाऊसाहेब तापकीर आणि
बाळासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष वसंत राठी
यांनी या डिसेंबर महिन्यात पुण्यात होणा-या रोलबॉल स्पर्धेच्या वर्ल्डकप स्पर्धेची महिती दिली.
अंतिम सामान्यापूर्वी कुदळे यांना दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली आणि
त्यांनी चेंडू हवेत उडवून सामन्याचा प्रारंभ केला. पुण्याच्या तुलनेत कोल्हापूरचा संघ हा कौशल्यात
जरी कमी वाटत असला तरी त्यांनी चांगली लढत देत अनेक गोल वाचवले. मध्यंतराला दोन्ही
संघांनी प्रत्येकी एकेक गोल केला होता. मध्यंतरानंतर पुण्याच्या खेळाडूंनी बचाव व आक्रमण
यांचा सुंदर मिलाफ साधत शेवटी ७ विरूद्ध १ अशा मोठ्या फरकाने कोल्हापूरवर मात करत
सामना जिंकला. पुणे संघाकडून आगम शहाने सर्वाधिक ४ गोला केले तर मधुसुदन, श्रेयस आणि
सुधांशू यांनी प्रत्येकी एक गोल करत त्याला साथ दिली. कोल्हापूरकडून एकमेव गोल आदित्यने
केला. मुलांच्या गटात तिस-या स्थानासाठी यवतमाळ आणि पिंपरी-चिंचवड संघा दरम्यान झालेला
सामना यवतमाळ संघाने ४ विरूद्ध ० असा सहज जिंकून स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.
मुलिंच्या गटात अंतिम लढतीत पुणे संघाने सातारा संघाचा ७ विरूद्ध ० असा धुव्वा उडवला. पुणे
संघाकडून सेजल, सुहानी, धृती आणि तनिष्का यांनी गोल नोंदवले. याच गटात तिस-या
स्थानासाठी रायगड आणि नगरच्या संघात लढत झाली. त्यात नगरच्या संघाने ३ वरूद्ध १ असा
रायगड संघाचा पराभव करत तिसरे स्थान मिळवले.