नवी दिल्ली- गरीबातल्या गरीब माणसापर्यंत आपल्या वाहनाचा कसा उपयोग होईल , ते कसे पोहोचेल? आणि दणकट टिकाऊ उत्पादन कसे निर्माण करता येईल या दृष्टीने देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकासात मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे आता भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनानुसार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी ‘कायाकल्प’ परिषदेची स्थापना केली असून तिचं अध्यक्षपद रतन टाटा यांना देण्यात आले आहे
देशभर विस्तारलेली रेल्वे गर्दीचा भार पेलून साफ वाकली आहे, बकाल झाली आहे. अस्वच्छता आणि असुरक्षिततेच्या गर्तेत अडकली आहे. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीनंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेत सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी काही नव्या शिफारशी आवश्यक आहेत. हे काम करण्यासाठी ‘कायाकल्प’ परिषदेची स्थापना करण्याचं सुरेश प्रभूंनी रेल्वे बजेटमध्ये जाहीर केलं होतं. त्या परिषदेच्या प्रमुखपदी एक मोठी व्यक्ती असेल, असंही त्यांनी सूचित केलं होतं. त्यानुसारच, हा पदभार रतन टाटा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. प्रभूंचे टाटांशी खास संबंध असल्यानंच हे शक्य झाल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. रेल्वे अर्थसंकल्पापूर्वीच प्रभूंनी टाटांना हा प्रस्ताव पाठवला होता. परंतु, त्यांचा होकार परवाच मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टाटा यांच्यासोबत या समितीवर शिवगोपाल मिश्रा आणि एम. रघुवैया या रेल्वे युनियनच्या नेत्यांचीही निवड करण्यात आली आहे. तसंच, कॅगचे माजी प्रमुख विनोद रायही सदस्य म्हणून या परिषदेवर नियुक्त केले जाऊ शकतात.
दरम्यान, २००९ मध्ये एअर इंडियाच्या सल्लागार मंडळाचं अध्यक्षपद सांभाळण्यास रतन टाटा यांनी नकार दिला होता. पण रेल्वेला नवं रूप देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार नक्कीच आशादायी आहे. टाटा हे विश्वासार्हतेचं दुसरं नावच मानलं जातं. त्यामुळे रतन टाटांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा कायापालट होईल, असा विश्वास बाळगायला काहीच हरकत नाही.
रेल्वेचा कायाकल्प सुधारणार रतन टाटा …
Date: