पुणे : कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कोरेगाव-भिमा येथे वढू येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमादिवशी १ जानेवारीला दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटे यांनी या प्रकरणी जामिन मिळावा या साठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
संबंधित गुन्हा गंभीर असल्याने त्यांना १४ पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली होती. त्याला एकबोटे यांचे वकील अॅड. एस. के. जैन यांनी आक्षेप घेतला. जैन म्हणाले, एकबोटे यांचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. पोलिसांनी कोठडी मिळविण्यासाठी जी कारणे दिली आहेत, ती योग्य नाहीत. पोलिसांना एकबोटे यांचा मोबाईल हवा आहे. त्यांना २ ते १० जानेवारी दरम्यान झालेल्या संभाषणाची माहिती हवी आहे. मात्र, ही माहिती पोलिसांना संबंधित मोबाईल कंपनीकडून देखील मिळू शकते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळला आहे. पोलिसांना तपास करण्याची संधी मिळाली पाहीजे. या साठी कमीत कमी कोठडी देण्याची मागणी न्यायालयाला केली. ती त्यांनी मान्य केली.