बेंगळुरू – बंगळुरूमध्ये झालेला स्फोट हा एक दहशतवादी हल्ला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. आपल्याला सुरक्षा व्यवस्था वाढवून अधिक सतर्कतेने काम करावे लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. ISISचा ट्विटर हॅंडलर मेहंदी मसरूर बिस्वास याच्या अटकेचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला असावा, असा संशय खुद्द कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केल्याने या स्फोटाचे गांभीर्य वाढले आहे.
बंगळुरूमध्ये रविवारी रात्री 8.30 वाजता वरदळ असलेल्या चर्च स्ट्रीट परिसरात स्फोट झाला होता. त्यात एका महिलेचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. एका रेस्तरॉच्या बाहेर झालेला हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. सीमीच्या फरार संशयित दहशतवाद्यांचा या घटनेमागे हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बॉम्ब स्फोटानंतर दिल्ली, कोलकाता, मुंबईसह देशभरात प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट घोषित केला आहे.
पोलिसांच्या मते हा बॉम्बस्फोट कोकनट ग्रोव्ह रेस्टॉरंटच्या जवळ एका नाल्यात झाला. स्फोटात कमी तीव्रतेच्या आयआयडीचा वापर करण्यात आला आहे. घटनेबाबत माहिती मिळतात मोठ्या संख्येने फौज फाटा घटनास्थळी रवाना झाला होता. त्यानंतर लगेचच पोलिसांनी याठिकाणी तपास सुरू केला.
या घटनेत तामिळनाडूची महिला भवानी (35) आणि कार्तिक (25) हे दोघे जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तर दुस-या तरुणाची स्थितीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.