पुणे- डोळं रोखून काय बघता…पाव्हनं विचार काय हाय तुमचा, लाही लाही होते माझ्या अंगाची…,बाई मी लाडाची
ग लाडाची, कैरी पाडाची…, आबा जरा सरकून बसा की …, साजणा जडली तुम्हावर प्रिती …अशा एकाहून एक
सरस, नाच, गाणं आणि अदाकारीचा त्रिवेणी संगम असलेल्या ठसकेबाज लावण्या, लोकगीते व चित्रपट गीतांवर
केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांना चिंब केले.
पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर, स्वाती दसवडकर व सहकारी यांचा ‘अहो..नादच खुळा हा
कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. रसिकांच्या टाळया आणि शिट्यांनी नाट्यगृह दणाणून सोडले.
लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर यांनी स्वत: गायलेल्या डोळं रोखून काय बघता…पाव्हनं विचार काय हाय तुमचा
या लावणीला, त्यावर केलेल्या नृत्याला व त्यांच्या अदाकारीला, युवा लावणी सम्राज्ञी अर्चन जावळेकर यांच्या ‘दूर
उभे का जवळ याना..मला वाटते भीती..’ व सजना जडली तुम्हावर प्रिती, संगीता लाखे यांच्या ‘आबा जरा सरकून
बसा’ .. तर प्राची मुंबईकर यांच्या तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला..’ .या लावण्यांना टाळ्या, शिट्या
आणि वन्समोअरने प्रेक्षकांनी नाट्यगृह डोक्यावर घेतले. स्वाती दसवडकर यांनी लावणीच्या छक्कड या प्रकारावर व
‘शांताबाय..’ या लोकगीतांवर केलेल्या नृत्याच्या अदाकारीने रसिकांना अक्षरशः घायाळ केले. एकामागोमाग एक
वन्समोअर, त्यांच्याबरोबर उपस्थित नाचणारा प्रेक्षकवर्ग, शिट्या याने संपूर्ण नाट्यगृह दणाणून गेले.
याशिवाय, ‘लाडाची ग लाडाची.. कैरी पाडाची’, आंबा तोतापुरी, ‘सोडा सोडा राया हा नादखुळा’…मी तुझी मैना..तुम्ही
माझे राघू’.., ‘फँड्री’चित्रपटातील गाजलेले ‘तुझ्या प्रीतीचा इंचू चावला’ या गाण्यावरील अॅटमसॉंग, …अशा लावण्या
व लोकगीतांवर केलेल्या नृत्याचा अविष्काराने थिरकलेली पाऊले आणि लय, अदाकारीला प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्या
वाजवत भरभरून प्रतिसाद दिला.
बालगंधर्व रंगमंदिर पुणे फेस्टिव्हलचे प्रमुख श्रीकांत कांबळे,अतुल गोंजारी व राजू साठे यांच्या हस्ते कलाकारांचा
सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिवलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख मोहन टिल्लू यावेळी उपस्थित होते
कलर्स मराठी वाहिनी हे २७ व्या पुणे फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक आहेत.