मुंबई- राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या पीएला५० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. मिलिंद कदम असे अटक केलेल्या पीएचे नाव आहे. रणजित पाटील यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे असलेले विधी व न्याय विभागाचेही राज्यमंत्रीपद आहे. या विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम यांनी वर्ध्यातील एका वकिलाला नोटरी म्हणून नियुक्ती करण्यासाठी 4 लाख रूपयांत सौदा फिक्स केला होता. दरम्यान, थेट मंत्रालयातील अवर सचिव पदावर आरूढ असलेल्या अधिका-याने ही लाच घेतल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून संबंधित अधिका-याला मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप लावून पकडले असल्याची प्रतिक्रिया रणजित पाटील यांनी दिली आहे.गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी करण्यात येत असल्याचे प्रकरण मागील आठवड्यात समोर आले होते. भाजपच्या अंतर्गत हेव्या-दाव्यातूनच हा प्रकार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान मिलिंद कदमबाबत मिळालेली माहिती अशी की, विधी व न्याय विभागाची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्याची कदम यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्र्यांशी संबंध येतो. मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यातील एका वकिलाची नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती केली होती. त्यासंबंधीची कागदपत्रे कदम यांच्याकडे आल्यानंतर त्याने शक्कल लावत थेट वकिलाशी संपर्क साधून नोटरी म्हणून तुमची आठवड्याभरात नियुक्ती होईल असे सांगितले व मुंबईला भेटायला बोलावले. त्यावेळी कदम यांनी अप्रत्यक्षरित्या लाचेची मागणी केली. संबंधित वकिल वर्ध्यातून मुंबईला भेटायला आल्यावर कदम याने वकिलाकडे ५ लाख रूपयांची मागणी केली. अखेर४ लाखांना सौदा पक्का झाला.
दुसरीकडे, संबंधित वकिलांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी परिचय असल्याने या वकिलाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना तुमची नियुक्ती झाल्याचे सांगितले. मात्र, कदम याने पैसे मागितल्याचे वकिलाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (एससीबी) तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार ट्रॅप लावण्यात आला. संबंधित वकिलाने कदमशी बोलणे करून सायंकाळी दादर परिसरात भेटायचे कबूल केले. त्यानुसार कदम व वकिल सीएसटीतील हॉटेल शिवाला येथे भेटले. त्यावेळी वकिलाने कदम यांना ५० हजार रोख दिले व उर्वरित रक्कम उद्या देतो असे सांगितले. हॉटेलमधून बाहेर पडताना पैशाचा पुडका असलेली बॅग कदम याने वकिलाकडून घेतली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने कदम याला रंगेहाथ पकडले. एसीबी मिलिंद कदम यांची चौकशी करीत आहे.