पुणे, – क्रेडाई – नैशनल चे पंधरावे ‘आंतरराष्ट्रीय वार्षिक अधिवेशन’ (नाटकॉन – १५) नुकतेच इस्तंबूल येथे पार पडले. नाटकॉनला पहिल्यांदाच भारतामधील हजाराहून अधिक सभासद सहभागी होते. या अधिवेशनास भविष्यातील शहरीकरण तसेच रिअल इस्टेट मधील संधी, रिअल इस्टेट वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा होणारा परिणाम, रिअल इस्टेटमध्ये लागणारी विपणन कौशल्य, व्यावसायिक व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच बांधकाम व्यावसायिक सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये घर कसे देऊ शकतो याबद्दलही तेथे चर्चा करण्यात आली.
‘भविष्यातील शहरीकरण’ या विषयावर मैक – किंसीचे संचालक आणि वरिष्ठ भागीदार शिरीष संखे यांनी मार्गदर्शन केले. ‘राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम’ याविषयी संवाद आणि माहिती तंत्रज्ञानाचे माजी मंत्री डॉ. अरुण शौरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘विपणन कौशल्य’, ‘व्यावसायिक व्यवस्थापन’ ओगील्व्हीचे अध्यक्ष पियुष पांडे व एसर ग्लोबल होल्डिंगचे आदिल मालिया यांनी केले.
क्रेडाई – नैशनलचे चेअरमन इरफान रझाक यांनी सीएसआर, भारत स्वच्छता अभियान याबाबत आपले मत मांडले तसेच या दोन्ही मोहिमेमध्ये क्रेडाई च्या सदस्यांनी आपापल्या शहरामध्ये स्वतःहून सहभागी होण्याचे आवाहनही केले. या अधिवेशनाचे उद्घाटन चेम्बर ऑफ कॉमर्स, तुर्की चे उपाध्यक्ष एच. अली. तायलान यांनी केले. तसेच ‘क्रेडाई – महाराष्ट्र’ आणि ‘एमसीएचआय- क्रेडाई’ ने मिळून या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली होती. आयोजन समितीमध्ये क्रेडाई – नैशनलचे उपाध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई – महाराष्ट्रचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई – नैशनलचे मानद सचिव बोमन इराणी तसेच मानद खजिनदार अनुज भंडारी इत्यादी सभासद होते.