पुणे-(‘प्राब’कडून)
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह असून विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छूकांचा डोळा आहे. काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीला जास्त खिंडार पडण्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला गळती लागण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सोबतच जिथे जागा शिवसेनेकडे आहे तिथे आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदार व पदाधिकारी यांच्यामध्ये भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे, जयकुमार गोरे, बबनदादा शिंदे, दिलीप सोपल, ज्योती कलानी, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, रमेश कदम, दत्तात्रय भरणे, प्रदीप कंद, चेतनसिंह केदार, रणजित शिंदे आदि. समावेश असल्याची चर्चा आहे. तर कॉंग्रेसचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी पक्ष प्रवेशाची शक्यता व चर्चा तथ्यहीन असल्याचे म्हंटले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पहिला धक्का माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिला. माढा लोकसभेच्या जागेवर सुरू झालेल्या राजकारणानंतर मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी सोडली आहे. त्यांच्यामागे काही आमदार देखील आता विधानसभा निवडणुकीत देखील पक्ष सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि उल्हासनागरच्या ज्योती कलानी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. चेतनसिंह केदार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. पंढरपूर येथील भाजपा मेळाव्यात चेतनसिंह केदार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील. माजी उपनगराध्यक्ष म्हणुन काम पाहिलेले चेतनसिंह केदार भाजपवासी होत असल्याने सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. तर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. संग्राम जगताप यांनी दक्षिण नगर मधून राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूक लढली होती पण महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी भाजपला केलेली मदत त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जाते आहे. कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे देखील सेनेच्या मार्गवर असल्याची चर्चा आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत अनेकांनी भाजप प्रवेश केला होता. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील हाच ट्रेंड दिसण्याची शक्यता आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे पुत्र रणजित शिंदे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके आगामी विधानसभेला भाजपच्या मार्फत शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार रमेश कदम आगामी विधानसभेसाठी शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि काही महत्त्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीपक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाणार असल्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर माजी मंत्री आणि पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्यासाठी मोठा धक्का बसणार आहे. येत्या 15 ऑगस्ट पूर्वी हे सर्वजण भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विविध पक्षीय आमदारांमध्ये राजीनामा दिलेले सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेशास उत्सुक असल्याची चर्चा आहे. यामध्ये शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे.