आबालवृद्धांना आवडेल ‘लाल दिनांक’

Date:

दिनदर्शिकेवरील ‘लाल दिनांक’ म्‍हणजे सुट्टीचा दिवस. शालेय जीवनात अशा लाल अक्षरातील तारखा अनेकांना आवडत असणार. हीच मानसिकता लक्षात घेवून नागेश सू. शेवाळकर यांनी  ‘लाल दिनांक’ नावाचा कथासंग्रह वाचकांच्‍या भेटीसाठी सादर केला आहे. यात एकूण 15 कथा आहेत. ‘बालमन’ केंद्रीय स्‍थानी ठेवून त्‍या निर्मिल्‍या असल्‍या तरी सर्वच वयातील वाचकांना त्‍या आवडतील अशाच आहेत.

            आदर्श शिक्षक, सेवानिवृत्‍त मुख्‍याध्‍यापक तसंच सुप्रसिध्‍द लेखक असलेले नागेश सू. शेवाळकर यांनी धार्मिक साहित्‍य, चारोळी, प्रवासवर्णन, चरित्रग्रंथ, कथासंग्रह, कादंबरी, इंग्रजी अनुवाद अशी विविध प्रकारची साहित्‍य निर्मिती केलेली आहे. नामवंत दिवाळी अंकांतही त्‍यांची नियमित हजेरी असते.

            ‘लाल दिनांक’ या कथासंग्रहातील कथांचं वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍या भारतीय संस्‍कृतीचं महत्‍त्‍व लक्षात आणून देणाऱ्या आहेत. आजच्‍या धकाधकीच्‍या, स्‍पर्धेच्‍या जगातील बालमन आणि बालजीवन लक्षात घेवून कथांमधून देण्‍यात आलेला संदेश, संस्‍कार उल्‍लेखनीय ठरतो. कथांचे विषय विविधांगी आहेत. त्‍यात कल्‍पनारम्‍यता नसली, चमत्‍कृती नसली तरी वाचकांना खिळवून ठेवण्‍याची शक्‍ती आहे. सर्वच कथांचा पोत, घाट आणि संस्‍काराचा धागा एकच आहे.

            ‘आमच्‍या मिस..आजी’ मधील आजी या मूलत: प्रेमळ शिक्षिका असून सेवानिवृत्‍तीनंतर मुलांना जुनी संस्‍कारगीतं, जुने खेळ शिकवून आपला वेळ सत्‍कारणी लावतात. ही  कथा व ‘प्रोत्‍साहन’ मधील जोशीसर (काका) इतर सेवानिवृत्‍त शिक्षकवर्गासाठीही प्रेरणादायी ठरु शकतात. ‘पंख मायेचे’ मधील माधव हा  के.जी. मध्‍ये शिकणारा. सकाळी लवकर उठून शाळेत जावं लागत असल्‍यानं त्‍याचं बालवयातलं स्‍वातंत्र्य हिरावून गेलेलं. शाळेच्‍या दप्‍तराचं ओझं, मनानं व शरिरानं थकून जात असल्‍यानं होणारी चिडचिड यावर केलेला प्रयोग मनाला स्‍पर्शून जातो.

            29 फेब्रुवारी ही तारीख केवळ लिप वर्षातच येते. त्‍यामुळं या तारखेला वाढदिवस असणाऱ्या ‍मुलांचा नक्‍कीच हिरमोड होत असणार. ‘वाढदिवस सचिनचा’ या कथेतील नायकाचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला असतो. तो साजरा करण्‍यासाठी केलेली युक्‍तीही आनंददायी आहे. ‘श्‍यामची पत्रावळ’ मधून देण्‍यात आलेला पर्यावरण रक्षणाचा संदेश तसंच प्रत्‍येकाला स्‍वत:चे काम स्‍वत:लाच करता आले पाहिजे, हा संदेश प्रत्‍येकाला पटणारा आहे.  ‘आठवण एका करामतीची’ मध्‍ये लेखकानं स्‍वत:च्‍या बालपणी घडलेला किस्‍सा सांगितला. डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याशिवाय कोणत्‍याही गोळ्या खाऊ नये, हा धडा त्‍यांना व वाचकांनाही त्‍यातून मिळतो. अजाण मुलांशी तात्‍पुरत्‍या समाधानासाठी खोटं बोललेलं कसं अंगलट येवू शकतं, हे ‘परिकथा’ वाचल्‍यावर कळतं. 

            न सांगता पैसे घेणं म्‍हणजे चोरीच आहे. चोरी करणं हे पाप आहे, असा संस्‍कार असलेला गरीब ‘विश्‍वास’ संशयाच्‍या भोवऱ्यात सापडतो. त्‍याची परीक्षा घेण्‍यासाठी जाळं विणण्‍यात येतं, पण संस्‍कारांमुळं तो कसा जिंकतो  हे ‘विश्‍वास जिंकला’ या कथेत अनुभवल्‍यावर वाचकांचंही मन भरुन आल्‍याशिवाय राहत नाही. ‘श्रावणबाळ’ या कथेतील विजय हा शांत, समाधानी, कष्‍टाळू आणि अभ्‍यासू मुलगा. आई-वडिलांना कायम मदत करायचा. त्‍यामुळं काही मुलं त्‍याला ‘श्रावणबाळ’ म्‍हणून हिणवत. पण प्रेमानं व संयमानं जग जिंकता येते, या मूल्‍यांवर त्‍याची निष्‍ठा असते. या निष्‍ठेमुळेच तो त्‍याच्‍यावर आलेल्‍या संकटावर कशी मात करतो, हे लेखकांनं उत्‍तमरित्‍या मांडलं आहे.   

            ‘बक्षिसाची किमया’ मधील अमित हा सातवीतील विद्यार्थी. खेळ आणि खेळ यातच रमणारा. सचिन तेंडुलकर त्‍याचा आदर्श. तेंडुलकर फक्‍त बारावीच शिकलेला आहे. त्‍यामुळं अमितचं शिक्षणाकडं दुर्लक्ष होत होतं.  त्‍याच्‍या मुख्‍याध्‍यापकानं अमित हा शिक्षण आणि खेळांतही कसं प्रावीण्‍य मिळवेल, यासाठी योजलेली किमया लक्षवेधक ठरते.  गणेशोत्‍सवात होणारा धांगडधिंगा पाहून व्‍यथित झालेल्‍या गणपती बाप्‍पाची भावना ‘पत्र बाप्‍पाचे’ मध्‍ये वाचायला मिळते. बळजबरीनं गोळा केली जाणारी वर्गणी, गणपतीच्‍या दिवसात केले जाणारे उपवास, कानठळ्या बसणारं संगीत यावर परखडपणे भाष्‍य करण्‍यात आलं आहे.    मुलांनी आपलं स्‍वप्‍न ठरवतांना शारीरिक, बौद्धिक क्षमता यांचा विचार करावा, जे झेपेल ते ध्‍येय निश्चित करुन कष्‍टाच्‍या जोरावर यश मिळवावं, असा संदेश बाप्‍पा देतात. स्‍वप्‍नपूर्ती झाली नाही म्‍हणून खचून जाऊ नका, असा सल्‍लाही ते देतात.

            महाशिवरात्रीच्‍या दिवशी अजयचा वाढदिवस असतो. या दिवशी केक कापलाच पाहिजे, असा हट्ट   धरणाऱ्या अजयची इच्‍छापूर्ती ‘एक वाढदिवस असाही…’ मध्‍ये कशी केली जाते, हेही रंजकतेनं मांडलं आहे.  ‘नातू माझा भला’ मधील ओम्‍कार आपल्‍या आजीची गंमत करता-करता कसा अडचणीत सापडतो. ह्दयविकाराचा झटका आलेल्‍या आजीला दवाखान्‍यात नेण्‍यासाठी करावी लागणारी धडपड वाचकांचीही धडधड वाढविते. यावेळी  ‘लांडगा आला रे लांडगा’ ही गोष्‍टही आठवल्‍याशिवाय राहवत नाही.

            नागेश सू. शेवाळकर हे व्‍यवसायानं शिक्षक असल्‍यानं त्‍यांनी मुलांची चांगली जडण-घडण व्‍हावी हा उद्देश साध्‍य करतांना ‘बालवाचकांना भावणारी कथा’ म्‍हणून त्‍यातील सकसताही जपली आहे. या कथेतील बालनायक हे सर्व 12 ते 14 वर्षांच्‍या आतील आहेत.  बालसुलभ हट्टीपणा त्‍यांच्‍यात दिसून येतो. लेखकानं त्‍यांचा हट्ट पुरवतांनाही ते समंजस कसे होतील, याचीही दक्षता घेतलेली आहे. बालवाचकांची  ग्रहणशक्‍ती लक्षात घेवून या कथा लिहीलेल्‍या आहेत. सहजसोपी भाषा, अंत:करणाला भिडणारे प्रसंग यामुळं ‘लाल दिनांक’ हा बालकथासंग्रह आबाल-वृद्धांना आवडेल, असा विश्‍वास वाटतो.

लेखक– नागेश सू. शेवाळकर

मुखपृष्‍ठ – स्‍नेहा गोगटे  

प्रकाशक –सोहम क्रिएशन अॅण्‍ड पब्लिकेश, पुणे 

पृष्‍ठं- 120  

किंमत- 150 रुपये

समीक्षा -राजेंद्र सरग 9423245456

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...