मुंबई – आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, राणा यांना रविवारी पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली. तत्पूर्वी शनिवारी सकाळी कपूर यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांनी चौकशीत सहकार्य करत नव्हते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा यांना आज स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ईडीने शुक्रवारी उशिरा रात्री राणा यांच्या घरावर छापा मारला होता. कपूर यांच्या मुंबईतील समुद्र महाल टॉवर येथील घरी रात्री उशिरापर्यंत तपास यंत्रणेच्या पथकाने शोध घेतला होता. परिस्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने येस बँक खातेधारकांना 50,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. तसेच 30 दिवसांसाठी बँकेच्या बोर्डाचा ताबा आपल्या हाती घेतला आहे.
कपूर यांच्यावर अनियमिततेचा आरोप आहे
येस बँकेचे संस्थापक, माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्यावर व्यावसायिक घरांना कर्ज देण्याची व वसुलीची प्रक्रिया आपल्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आहे. येस बँकेने अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी टॉवर, एस्सार पावर, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप यांसारख्या कंपन्यांना कर्ज देण्यात आघाडीवर राहिली आहे. हे समुह डिफॉल्ट असल्याचे सिद्ध झाल्याने बँकेला मोठा धक्का बसला. 2017 मध्ये बॅंकेने 6,355 कोटी रुपयांची रक्कम बॅड लोनमध्ये टाकली. त्यानंतर आरबीआयने बँकेवर लगाम आवळण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये आरबीआयने राणा कपूर यांच्यावर कर्ज आणि बँलेन्स शीटमध्ये अफरातफर केल्याचा आरोप केला. सोबतच त्यांना चेअरमन पदावरून जबरदस्तीने हटवले. बँकेच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा प्रकारे अध्यक्षांना काढून टाकले गेले आहे.

