- 10 दिवसांत बाधित रुग्ण चौपट, आता लॉकडाऊन दोन आठवडे वाढण्याची शक्यता
- घाबरू नका, अजून अशी स्थिती आलेली नाही : केंद्र सरकार
- महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी सामुदायिक संसर्ग नाकारला
- डब्ल्यूएचअो अहवालात भारतात सामूहिक संसर्गाचा उल्लेख, अजून सामुदायिक प्रसार झालेला नाही नवी दिल्ली/चंदीगड. पंजाबमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आता सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यावर आल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केेला. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा दावा फेटाळून अद्याप देशात ही स्थिती नसल्याचे म्हटले आहे. कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, राज्यात २७ रुग्णांची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. यातील बहुतांश सामुदायिक प्रसाराचे बळी आहेत. पंजाबमध्ये आतापर्यंत १०१ रुग्ण आढळले अाहेत. मात्र, सिंग यांचा हा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी फेटाळला. घाबरण्याचे कारण नाही, असे सांगून ती स्थिती आली तर तत्काळ कळवले जाईल, असे ते म्हणाले. कॅ. सिंग यांनी सामुदायिक संसर्गाचा दावा करून पंजाबमध्ये लॉकडाऊन १ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केवळ शेतकऱ्यांना यातून थोडी सूट मिळेल. गुरुवारी ओडिशाने ३० तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवले होते.
१६ हजार चाचण्या, २% पॉझिटिव्ह
आरोग्य मंत्रालयानुसार, गुरुवारी कोरोनाच्या १६,००२ चाचण्या झाल्या. यात केवळ २% रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मोदी आज करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
देशात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. किमान हे लॉकडाऊन १४ दिवस आणखी वाढेल, अशी परिस्थिती सध्या आहे. यावर शनिवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील. संसर्गाची स्थिती व विविध सूचनांनुसार हे लॉकडाऊन याच स्वरूपात वाढवले जाईल किंवा त्याचे स्वरूप व काही भागांत सूट देण्याबाबत निर्णय होईल हे ठरवले जाईल. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या व्हीसीपूर्वी गृह मंत्रालयाने राज्यांकडून २१ दिवसांच्या लॉकडाऊनवर मत मागवले आहे. नागरिकांना अधिक सेवांसाठी सूट दिली जावी काय, अशी विचारणा करण्यात आली आहे. बिहारसह काही राज्यांनी सूचना पाठवल्या असून ग्रामीण भागांत सूट देण्याबाबत अधिक सूचना आहेत. २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा करताना ऑनलाइन प्लॅटफॉर्म व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना यातून सूट दिली गेली होती. याशिवाय आरोग्य, स्वच्छता, पोलिस, माध्यमे आणि बँक कर्मचाऱ्यांनाही सूट देण्यात आली होती.
मुंबई व महानगर क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात लॉकडाऊन काढून घेण्याचा ठाकरे सरकारचा विचार
- सूत्रांनुसार, महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातच लॉकडाऊन असावे, असे राज्य सरकारला वाटते. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना राज्य सरकार मात्र केवळ मुंबई व एमएमआरमध्येच लॉकडाऊनबाबतचे नियम लागू करू इच्छित आहे.
- तामिळनाडूत वैद्यकीय तज्ञांच्या एका गटाने लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्याची शिफारस केली आहे. या आधारे शनिवारी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावतही लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने आहेत.
- आसामच्या गुवाहाटीत आवश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ऑड-ईव्हन नियम लागू केला जाईल. अत्यावश्यक सेवेचे स्टिकर्स लावलेल्या वाहनांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊनदरम्यान गर्दी, मिरवणुकांना परवानगी देऊ नका : गृह मंत्रालय
आगामी सणासुदीचा काळ पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले असून लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांना तसेच मिरवणुकांना परवानगी देऊ नये, असे म्हटले आहे. साेशल मीडियावरील आक्षेपार्ह माहितीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना आहेत. आगामी काळात बैसाखी, रंगोली, बिहू, विशू असे सण उत्तर भारतात होत आहेत.
ओडिशानंतर पंजाबही 1 मेपर्यंत लॉक; आता सामुदायिक संसर्ग सुरू : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
Date:

