पिंपरी-कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाजातील प्रत्येक घटकाला झळ सोसावी लागत असून, यातून रिक्षाचालकही सुटलेले नाहीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील जवळपास ऐंशी हजाराहून अधिक रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने रिक्षाचालकांना आर्थिक मदत आणि अन्नधान्याची मदत करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी भारतातही लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे
सर्वच बाबतीत मर्यादा आलेल्या आहेत. शासनाने रिक्षालाही बंधने घातली आहेत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी रिक्षामध्ये फक्त एकाच प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच रिक्षा स्टँडवरही दोन तीन रिक्षा उभ्या करू दिल्या जातात. पोलिसांच्या या आवाहनाला रिक्षाचालक पूर्ण सहकार्य करीत आहेत. मात्र, संपूर्ण संचारबंदीमुळे प्रवाशीच नसल्याने रिक्षा बंद ठेवाव्या लागत आहेत. परिणामी रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. साधारणपणे ऐंशी हजार रिक्षा आहेत. एका रिक्षावर अवलंबून असलेले चार लोक पकडले तर सव्वातीन ते साडेतीन लाख लोकांचा उदरनिर्वाह चालतो. या लोकांना आज आधाराची गरज आहे. दैनंदीन खर्च, आजारपण, कर्जाचे हप्ते, घरभाडे यासाठी पैसे कुठून आण्याचे, असा प्रश्न सतावत आहे. या संकटातून वाचविण्यासाठी रिक्षा चालकांना शासनाने अन्नधान्य व आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

