· अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 मार्च 2021
फेब्रुवारी 12, 2021 : परदेशांत पदव्युत्तर अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या गुणवंत पदवीधरांना ‘के. सी. महिंद्रा शिष्यवृत्ती’ देण्याकरीता, ‘के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट’तर्फे या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यशस्वी अर्जदारांना जास्तीत जास्त 4 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती मिळू शकेल. याव्यतिरिक्त, ‘के. सी. महिंद्रा फेलो’ म्हणून मान्यता मिळणाऱ्या तीन विद्वान विद्यार्थ्यांना प्रत्येकी 8 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
कोण अर्ज करू शकेल? शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवार भारतीय नागरिक असावा. त्याच्याकडे प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची समान दर्जाची पदविका असावी. शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे परदेशातील नामांकीत विद्यापीठामध्ये किंवा संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याचा दाखला असावा किंवा उमेदवाराने या संस्थांकडे प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा. परदेशातील संबंधित अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 व फेब्रुवारी 2022 या दरम्यान सुरू होणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा? www.kcmet.org या वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत असेल. निवडक विद्यार्थ्यांना जुलै 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या अंतिम मुलाखतींसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी विद्यार्थ्याला संबंधित विद्यापीठात वा संस्थेत प्रवेश मिळालेला असणे आवश्यक आहे.
‘के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट’कडून पात्र विद्यार्थ्यांना परदेशांमध्ये विविध क्षेत्रांत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी व्याजमुक्त स्वरुपाची कर्ज शिष्यवृत्ती 1956 सालापासून देण्यात येत आहे. 2020 मध्ये या शिष्यवृत्तीसाठी ट्रस्टकडे 1246 अर्ज आले. त्यांचे व्यवस्थित मूल्यांकन केल्यावर त्यातील 90 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या मुलाखती घेण्यासाठी नऊ सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली.
‘केसीएमईटी’ची शिष्यवृत्ती घेतलेले अनेक अभ्यासक आज प्रतिष्ठित संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन आणि अध्यापन करीत आहेत; एवढेच नव्हे, तर ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँकिंग, वाणिज्यिक व वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या येथे व्यवस्थापन व नेतृत्वही करीत आहेत. उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि कायदेशीर सेवा देण्याच्या व्यवसायांमध्ये ते आहेत आणि आयटी, बायोटेक्नॉलॉजी, कम्प्यूटिंग अशा उदयोन्मुख उद्योगांमधील मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आदी क्षेत्रांमध्ये ते प्रवेश करीत आहेत.
‘के. सी. महिंद्रा शिष्यवृत्ती’विषयी अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या:
www.kcmet.org