पुणे : कोविड काळात बॅरिकेटिंग करुन शहरातील विविध भाग बंद केले, याला विरोध न करता गणेशोत्सव मंडळांनी देखील सहकार्य केले. त्यामुळे पुण्याचा अभिमान वाटतो. कोविड काळात केलेले काम हे आमचे कर्तव्यच आहे. प्रामाणिकपणे काम करणे आणि ते इतरांमध्ये रुजविण्याचा मी प्रयत्न केला, असे मत पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील अष्टविनायक गणपती मंडळांच्या वतीने सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांचा कोविड काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल तसेच त्यांची पोलीस महानिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तुळशीबाग गणपती मंडळासमोर सन्मान करण्यात आला. यावेळी श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे प्रतिनिधी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे संजय जावळे, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, फळांची परडी, उपरणे असे सन्मानाचे स्वरुप होते.
डॉ.रवींद्र शिसवे म्हणाले, माझ्या कामाच्या प्रवासातील पुण्याची तीन वर्षे चांगली होती. गणेशोत्सव मंडळांनी केलेला हा सन्मान मला संघर्षासाठी उर्जा निर्माण करणारा आहे. यापुढे देखील असेच सहकार्य मला गणेशोत्सव मंडळांकडून मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्रीकांत शेटे म्हणाले, कणखर व संयमीवृत्तीने योग्य नियोजन करणारे डॉ.रवींद्र शिसवे यांचे व्यक्तिमत्व आहे. गणेशोत्सवात आॅनलाईन पद्धतीने दर्शन कशा प्रकारे भक्तांना मिळेल, याचे मार्गदर्शन त्यांनी मंडळांना केले. यामुळे महाराष्ट्रासमोर आदर्श गणेशोत्सव कसा असावा, याचे उदाहरण ठेवले.
महेश सूर्यवंशी म्हणाले, कोविड काळात पोलीस आणि महानगरपालिकेने मोठी प्रशासकीय जबाबदारी पार पडली. महापालिकेने आखून दिलेल्या नियोजनानुसार पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली. कोविडचे संकट वाढू नये म्हणून पोलिसांनी रस्ते बंद करुन झोन तयार करण्याचे योग्य नियोजन केले. त्यात डॉ.रवींद्र शिसवे यांचा मोठा वाटा होता. तसेच गणेशोत्सव चांगुलपणाची स्पर्धा करीत साधेपणाने साजरे करुया, ही संकल्पना देखील त्यांनी राबविली,या असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

