पुणे : कोरेगाव भीमा युद्धातील शहीद झालेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यामध्ये यावर्षी उच्चांकी गर्दी होईल अशी खात्री समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यात येत असून त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. समाज माध्यमे व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे नागरिकांमध्ये उत्साह संचारला असून जास्तीत जास्त लोक अभिवादनासाठी येणार आहेत अशी माहिती डंबाळे यांनी यावेळी दिली.
उत्सव यशस्वी व्हावा व अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती, पोलीस, जिल्हा परिषद , सार्वजनिक बांधकाम, पीएमपीएमएल, महसूल विभाग यासह विविध विभागांचे 22,000 पेक्षा अधिक कर्मचारी अत्यंत मनोभावे काम करत आहेत. आंबेडकरी चळवळीकडून या कर्माचारी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून साजरा होणारा आंबेडकरी चळवळीचा देशातील एकमेव उत्सव असल्याने याबाबत प्रशासनाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे अशी देखील भावना डंबाळे यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून अभिवादन केलेले असल्यामुळे या ठिकाणी आपणही अभिवादन करायला हवे हीच सकारात्मक भावना सर्व अनुयायांमध्ये आहे तसेच पोलीस विभागाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करत समाजकंटकांवर व समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या नकारात्मक पोस्टवर होत असलेल्या कारवाईमुळे उत्सवावर कोणताही तणाव यावर्षी जाणवत नाही व याचा संपूर्ण फायदा उत्सवाला मिळत आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात येत असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

