‘मला शिक्षा द्या, पण पोलिसांवर कारवाई करू नका’; प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा
नवी दिल्ली: आग्रा येथे पोलिस कोठडीत अरुण वाल्मिकी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आग्र्याला जाणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला यूपी पोलिसांनी लखनऊ- आग्रा महामार्गावर रोखलं आणि ताब्यात घेतलं. , यावेळी काही महिला पोलिसांनी प्रियांका गांधींसोबत सेल्फी/फोटो काढले. असे फोटो काढणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना फोटो काढल्यावर मात्र कारवाईची भीती सतावू लागल्याचे वृत्त येताच प्रियांका गांधी यांनी हवे तर मला शिक्षा द्या पण त्यांच्यावर कारवाई करू नका असे स्पष्ट केले आहे.
प्रियंका गांधींचे महिला पोलिसांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियांका गांधी यांनी महिला पोलिसांसोबत सेल्फी क्लिक केल्यानंतर एक ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, “मी ऐकलंय की, योगी जी हे फोटो पाहून इतके अस्वस्थ झाले की त्यांना या महिला पोलिसांवर कारवाई करायची आहे. माझ्याबरोबर फोटो काढणे गुन्हा असेल तर मला त्याची शिक्षा झाली पाहिजे. या मेहनती आणि निष्ठावान पोलिसांची कारकीर्द खराब करणे सरकारला शोभत नाही.”