कोरोनाग्रस्तांसोबत आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीकास्त्र
करोना प्रोटोकॉल न पाळता कोविड सेंटरमध्ये डान्स करणं ही रोहित पवारांची कृती निषेधार्ह
पवारांचा नातू म्हणून वेगळा न्याय का ?
प्रविण दरेकरांचा सवाल
मुंबई दि. २५ मे – कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला पीपीई किट न घालता किंवा कोव्हिड प्रोटोकॉल न पाळता रोहित पवारांनी भेट दिली, डान्स केला. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला असून “शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांना पाठीशी घातल जातयं का?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटर कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे. या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, “रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकतात. सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का? कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी करोना नियमांच गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे.”
आता या वादानंतर सरकार रोहित पवारांविरुद्ध कारवाई करणार का किंवा ही घटनासुद्धा काळाच्या पडद्याआड जाण्याची वाट पाहणार, हे काही दिवसात कळेलच.,
हे आहे रोहीत पवारांचे ट्वीट-आणि झिंगाट डान्स चा व्हिडीओ