मुंबई, 11 जून : . राज्य सभेत सेनेच्या संजय पवार यांच्या पराभवानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ज्या अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांनी आपल्याला दगा देत भाजपला मतदान केलं त्यांची नावे जाहीर केली आहेत. संजय राऊत यांनी आमदारांची नावे जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण राऊत यांनी जाहिर केलेली नावे अजितदादा यांचा शब्द मानणारी असल्याचा सुत्रां चा दावा आहे .
शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, मी 42 मतांवर लढलो आणि त्यातही एक मत बाद झालं. काही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते आणि ती मते बाद करण्याच्या प्रयत्नात होती. आमच्या लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. संजय पवार हे सुद्धा उत्तम प्रकारे लढले.संजय पवार यांच्या पराभवाने उद्धव ठाकरे सुद्धा व्यथित झाले आहेत.
आम्हाला असं वाटलं की, काही लोकांनी आम्हाला शब्द दिले होते ते पाळले नाहीत. विशेषत: वसई-विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय मामा शिंदे, अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे यांची मते आम्हाला मिळाली नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी थेट आमदारांची नावेच जाहीर केली आहेत.
– अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं, सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून मी अजितदादांसोबत आहे.मतदारसंघातील कुठलेही प्रश्न असले तरी अजित पवारांकडे गेलो तर काम होतं. अजितदादांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं म्हटलं. संविधानामुळे मिळालेला अधिकार मतदारसंघासाठी कसा करता येईल? हे मी पाहिलं.
मुख्यमंत्र्यांचा, शिवसेनेचा कुणाचाही माझ्यासोबत संपर्क नाही. त्यांनी संपर्क केला नाही तरी फरक पडत नाही. अजित पवारांनी सांगितलं तिथे मतदान करणार. भाजपला माहिती आहे की, देवेंद्र भुयार अजित पवारांचा पक्का आहे आणि त्यामुळे ते मला संपर्कच करत नाही.तर मतदानापूर्वी आमदार संजयमामा शिंदे यांनीही आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचंच म्हटलं होतं. संजयमामा शिंदे यांनी सुद्धा महाविकास आघाडीसोबतच असल्याचं म्हटलं होतं. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं की, अजितदादा सांगतील तिथे मतदान करणार आणि आता त्याच आमदारांवर संजय राऊत यांनी आरोप केला आहे. हे आमदार अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात.
त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे. मात्र या सर्व शंका,कुशंका आहेत.कुठेही त्यास भक्कम आधार नसल्याचे स्पष्ट आहे . त्यामुळे कदाचित अजीतदादा यांच्या विषयी संशयात्मक वातावरण करण्याचा हेतू ही या मागे असन्याची शक्यता नाकरता येणारी नाही.
संजय राऊतांच्या आरोपांवर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? मतदान हे गोपनीय राहतं. आम्ही दिलं की नाही दिलं हे यांना कसं माहिती.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत मी पूर्वीपासून आहे. शिवसेना नंतर आली. मी महाविकास आघाडीसोबत आहे. मी कुठलाही दगाफटका केला नाही.