दिल्लीतील आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
पुणे :
दिल्लीमधील आम आदमी पक्षाचे आमदार, विधानसभेचे माजी उपसभापती आणि तीन वेळा दिल्ली विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेले फतेह सिंह तसेच भारतीय लष्करातील माजी सैनिक व आपचे आमदार कमांडो सुरिंदर सिंह यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरुनानी यांनी पत्रकाद्वारे दिली.
फतेह सिंह यांनी गोकुलपुर, दिल्ली विधानसभा क्षेत्रातुन तर सुरिंदर सिंह यांनी दिल्ली- कैंटोनमेंट विधानसभा क्षेत्रातुन निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन अर्ज दाखल केले.
‘महाराष्ट्रा बाहेर आपले वर्चस्व कायम ठेवण्यास पक्षाला परत एकदा यश आले आहे. फतेह सिंह आणि सुरिंदर सिंह यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे पक्षाला दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होऊ शकेल. तसेच दिल्लीत या दोन्ही आमदारांचा मोठा जनसंपर्क आहे यामुळे पक्ष बळ्कट होणार आहे’, असे मत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकार स्थापनेच्या वेळी दिल्लीतुन राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईत सुखरूप आणण्याच्या यशस्वी कामगिरीमध्ये धीरज शर्मा यांचा मोलाचा वाटा होता. मध्यप्रदेश, गोवा अशा महाराष्ट्रा बाहेर राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणण्यासाठी देखील धीरज शर्मा यांनी यशस्वी काम केले आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धीरज शर्मा यांचे अभिनंदन केले आहे