खासदार काकडेंच्या पदयात्रेचा ‘सुपर संडे!’
युवकांनी मतदानाचा टक्का वाढवावा!
पुणे-आपला देश युवकांचा देश आहे. देशात 65 टक्के युवा वर्ग असून पुण्यातही तेवढीच संख्या आहे. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस शाश्वत विकासासाठी काम करीत आहेत. युवा वर्गाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असून युवा वर्गाने आता जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून काम करून भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानी निवडून द्यावे, असे आवाहन खासदार संजय काकडे यांनी विजय संकल्प युवा मेळाव्यात केले. दिपक चव्हाण यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
संजय काकडे यांनी आज रविवार निमित्ताने प्रचाराचा ‘सुपर संडे’ साजरा केला. पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार जगदीश मुळीक व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी खासदार संजय काकडे यांनी आज पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. धानोरी, भैरवनगर, गणेशनगर, बोपखेल परिसरातून काढण्यात आलेल्या आजच्या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण केले. विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.या पदयात्रेस युवा वर्ग व महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जगदीश मुळीक यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी युवा वर्ग, महिला मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आज येरवडा, गोखलेनगर, जनवाडी आदी परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेस खासदार संजय काकडे उपस्थित होते. पदयात्रेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि सिद्धार्थ शिरोळे यांना मोठ्या मताधिक्यानी निवडून देण्याचे आवाहन खासदार संजय काकडे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून उमेदवारांकडून प्रचारासाठी जनाधार असलेल्या व लोकप्रिय नेत्यांची मागणी होत आहे. खासदार संजय काकडे यांना मानणारा व चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळेच आज रविवारच्या सुट्टीनिमित्त वडगावशेरी विधानसभा व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार संजय काकडे यांच्या पदयात्रचे आयोजन करण्यात आले होते.