मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘ समृद्धी महामार्गाचा’ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी MH 49 BR 0007 क्रमांकाच्या मर्सिडीज ने सव्वाचार तासात 520 किमी अंतराचा प्रवास केला. आता ही गाडी नेमकी कुणाची आहे याचा तपास R T O च्या ऐप्प वरुन घेण्यात आल्याचे दिसते आहे. काँग्रेस पक्षाने फेसबुक वरील आपल्या पेज वरुन याबाबत पर्दाफाश केला आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीच स्टेअरिंग स्वतः फडणवीसांनी हाती घेतल्याने दुपारपासूनच गाडींची चर्चा सुरू झाली होती. या दौऱ्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. फडणवीस यांनी चालवलेली गाडी Mercedes-Benz G350d होती. फडणवीसांनी स्वतः 520 किमी ही गाडी चालवली. या गाडीची किंमत 2 कोटीहून अधिक असल्याचं सांगण्यात येत असताना आता ही गाडी बिल्डरची असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसच्या फेसबुकवरून करण्यात आला आहे. यावेळी पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहे. त्यामध्ये गाडी कोणाच्या नावावर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. फोटोवरून ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रकर या नावाने असल्याचं दिसून येत आहे.



