पुणे- आठ ही मतदार संघात शिवसेनेला डावलून भाजपचेच उमेदवार देणार असाल तर हे या विधानसभेच्या निमित्ताने पुण्यातील शिवसेना नेस्तनाबूत करण्याचेच राजकारण आहे असा स्पष्ट दावा शिवसैनिक करत असून आता स्वबळावर बंडखोरीची भाषा करत उमेदवारी अर्ज दाखला करण्याचा मनसुबा अनेकांनी बोलून दाखविला आहे. हि बंडखोरी शिवसेनेच्या अस्तित्व राखण्यासाठीच असेल असा हि दावा अर्ज दाखल करण्यापूर्वी केला जातो आहे .हि बंडखोरी हडपसर ,कसबा आणि कोथरूड आणि कदाचित वडगाव शेरी मतदार संघातून होईल असे दिसते आहे.दरम्यान वडगाव शेरी ,खडकवासला येथून काही जणांनी शिवसेनला असे डावलण्याचे राजकरण होणार असेल तर आम्ही भाजपमध्ये जायचे काय असा सवाल हि उपस्थित केला आहे.भाजप निष्क्रिय कार्यकर्त्यांना घडवीत आहे आणि शिवसेनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना संपवीत आहे असा हि सूर लावला जातोय .तर निवडून आल्यावर आम्ही शिवसेनेचेच आमदार म्हणून गणले जावू असाही दावा केला जातो आहे.
शहरातील आठही विधानसभांच्या जागांवर भाजपने उमेदवारांची नावे निश्चित केल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाराज शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. पक्षाकडून अजून कोणतेही आदेश नसले, तरी कसबा आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या इच्छुकांनी गुरूवारी (दि.3) रोजी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा माध्यमातून कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाकडून हे बंड शमविले न गेल्यास या दोन्ही ठिकाणचे उमेदवार अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
महायुतीत पुण्यात शिवसेनेला जागा मिळावी, अशी इच्छुकांची मागणी होती. त्यासाठी इच्छुकांनी वारंवार पक्षश्रेष्ठीकडे दावे केले होते. त्यातच, युती अंतिम झाल्याने गेल्या आठवडाभरात त्यांना स्वतंत्र लढण्याच्या तयारीसाठी मुंबईत वारंवार पाचारण केले जात होते. त्यामुळे युती होणार नाही, अशी शक्यता धरूनच कसबा, हडपसर, वडगावशेरीमधून इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली. पण, सोमवारी अचानक पुण्यात आठही जागांसाठी भाजपने उमेदवार निश्चित केले असून त्यांची नावेही सोशल मीडियात धडकली. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली, त्याचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले. तर ‘शहरात 2009 मध्ये शिवसेनेचे 3 आमदार असतानाही अवघ्या दहा वर्षांत आपला पक्ष संपला का, प्रत्येक वेळी आम्ही युती म्हणून फक्त भाजपच्या सतरंज्याच उचलायच्या का’ असे मेसेज कार्यकर्ते फिरवित होते. तसेच ‘पक्ष आपली दखलच घेणार नसेल, तर आपण राजीनामेच दिलेले बरे’ अशी चर्चाही अनेक ग्रूपवर रंगली होती.
दरम्यान, कसब्यातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी दि.3 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी शनिवारवाडा येथे हजर राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरून केले आहे. तर हडपसरमधून नगरसेवक नाना भानगिरे ससाणेनगर येथून मिरवणूक काढत अर्ज भरणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांचे हे बंडाचे निशाण पेल्यातील वादळ ठरणार, की ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार? हे त्याच दिवशी निश्चित होणार आहे.