पुणे-भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, कालच्या आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेवर आज नाशिक मध्ये खडसे यांनी ,’ भाजपमध्ये आलेल्या सर्वांना चॉकलेट बिस्किटे चं दिली वाटते ..असा उलट टोला दिला आहे . मात्र यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणे टाळले आहे. ‘रात गयी, बात गयी…’ असे म्हणत त्यांनी खडसेंविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या ‘अटल’ बस सेवेचा आज त्यांनी शुभारंभ केला. या कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सभागृह नेते धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,आयुक्त विक्रमकुमार, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत पीएमपीएमएलने पुणे शहरातील गर्दीच्या व अरूंद 9 मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी 97 बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. तसेच डेपो अंतर्गत टर्मिनल एकुण 53 मार्गावर 143 बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना 5 रू. दरात 5 कि.मी. अंतराचा सुखकर प्रवास करता येईल. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी दर 5 मिनीटांनी बसेस उपलब्ध असतील.
रस्त्यावरच ट्रॅफिक कमी करायचं असेल तर चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देणं आवश्यक आहे. याने वेळ आणि पैशांची बचत होणार असेल, तर लोक नक्की या सुविधेचा वापर करतील असा मला विश्वास आहे.