पुणे-भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीसह पुण्यातील तीन विद्यमान आमदारांना डच्चू येत भाजपने शिवसेनेकडे सतरंज्या उचलायचे काम ठेवत आपल्या आठही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
- पुण्यातील मतदारसंघ आणि उमेदवार
- कोथरूड- चंद्रकांत पाटील
- पर्वती- माधुरी मिसाळ
- हडपसर- योगेश टिळेकर
- वडगाव शेरी- जगदीश मुळीक
- शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे
- पुणे कॅन्टोमेंट- सुनील कांबळे
- कसबा- मुक्ता टिळक
- खडकवासला- भीमराव तापकीर
गिरीश बापट हे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या कसब्याच्या जागेवर गेली अडीच वर्षे महापौरपदावर असलेल्या मुक्ता टिळक तर कॅन्टोमेंट मतदारसंघात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना डच्चू देत त्यांचे बंधू, स्थायी समितीचे अध्यक्षपदावर विराजमान असलेले सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वतीत विअद्यामान आमदार यांना भाजपचे शहराध्यक्ष पद देवूनही पुन्हा विधानसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिंरजीव नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनाही उमेदवार देत शिरोळे कुटुंबावर झालेला अन्याय दूर करण्यात आला आहे. कोथरूड येथील विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना डच्चू देत त्या ठिकाणाहून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत. पाटील यांनी ‘सुरक्षित’मतदार संघ शोधत थेट कोल्हापूर येथून पुण्यात प्रवेश केला. सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोथरूड येथून त्यांना लढविण्यात येत आहे. लोकसभेला अनिल शिरोळे या विद्यमान खासदारांचे तिकिट कापत पुण्यातून बापट यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली. लोकसभेच्यावेळीच शिरोळे यांना शिवाजीनगर विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ते आश्वासन पाळत शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांना शिवाजीनगर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
ज्याप्रमाणे कांबळे यांच्यावर आरोप आहेत तसेच काहीसे आरोप टिळेकर यांच्यावर हि आहेत मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. टिळेकर यांना त्यांच्यावरील आरोपांनी या पूर्वीच हैराण केले पण फडणवीस त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक काळात त्यांच्यावरील आरोप त्यांचा पिच्छा सोडणार नाहीत आणि अशा स्थितीत आता मतदार पाठीशी राहील काय ? याचे उत्तर मिळणार आहेच .या सर्व उमेदवारात जगदीश मुळीक आणि सिद्धार्थ शिरोळे हे तरुण आणि कोणताही आरोप नसलेले उमेदवार आहेत .मुळीक यांना ५ वर्षात केलेल्या कामाचा पाढा पुन्हा मतदारांपुढे वाचवा लागणार आहे .शिरोळे यांना नगरसेवक पद ,पीएमपीएमएल च्या संचालकपदी केलेल्या कारभाराबाबत उजळणी करावी लागणार आहे. तसेच मिसाळ यांच्याकडे १० वर्षे आमदारकी आहे. या १० वर्षातला हिशेब मतदार मागणार कि निव्वळ मोदी ,फडणवीस यांच्या नावावर मतदान करणार हे स्पष्ट होणारच आहे. कसब्यात महापौरांची अडीच वर्षाची कारकीर्द त्यांच्या समोर उभी ठाकणार आहे . आणि या अडीच वर्षातल्या कारकीर्दीचा हिशेब देत त्यांना येथे सामना करावा लागणार आहे. कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटलांना कोण कोण किती कशी साथ देतेय ते पाहावे लागणार आहे . मात्र पाटील यांची उमेदवारी हि पुण्याचे नेतृत्व म्हणून पाहिली जाणार आहे . अर्थात बाहेरचा -आतला या वादाला सामोरे जात ते हा लढा कसा देतात ते दिसणारच आहे. कलमाडींची भाईगिरी संपली. अजीतदादांची पवारशाही मावळताना जाणवू लागली आहे आणि आता कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांची पाटीलकी पुण्यात या निमित्ताने सुरु होणार काय ? हे देखील पाहायला मिळणार आहे .