शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. यानंतर बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी नवं ट्वीट करत याला प्रत्युत्तर दिलं आहे.एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? असा थेट सवाल केला आहे, ते पुढे म्हणाले आहेत की, तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.
12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे शिंदे म्हणाले आहेत.