मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. पडळकराच्या वक्तव्यानं निर्माण झालेल्या वादावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गोपिचंद पडळकर यांच्याशी संवाद साधला आहे. भावनेच्या भरात हे विधान केल्याचं पडळकर यांनी मान्य केलं आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ‘शरद पवार आमचे राजकीय विरोधक आहेत ते शत्रू नाहीत. त्यामुळं कोणत्याही जेष्ठ्य नेत्यांवर अशाप्रकारची टीका योग्य नाही. याबाबत मी पडळकरांशी बोललो आहे. भावनेच्या भरात त्यांनी हे विधान केल्याचं मान्य केलं आहे. त्याबद्दल ते लवकरच स्पष्टीकरण देतील,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ‘कठोर भावना मांडत असताना शब्द योग्य हवेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बोलताना संयम बाळगणे महत्त्वाचं आहे,’ असंही ते म्हणाले.