पाटणा-नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश यांनी हिंदीत देवाच्या नावाने शपथ घेतली. त्यानंतर लगेचच तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.तेजस्वींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या मातोश्री राबडी देवीही राजभवनात पोहोचल्या. मात्र, तेजस्वींचे वडील आणि आरजेडी सुप्रीमो लालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र, शपथविधीपूर्वी नितीश यांनी लालूंशी फोनवर बोलून राजकीय परिस्थितीची माहिती दिली.
. भाजपाशी काडीमोड घेऊन राजदशी संसार थाटत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राजकारणात काहीही अशक्य नसल्याचंच दाखवून दिलं आहे. २०१७मध्ये “काहीही झालं तरी राजदसोबत जाणार नाही” म्हणणारे नितीश कुमार आज त्यांच्याच पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाहीर आव्हान दिलं आहे.

…म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला
नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खुद्द भाजपामधून यासंदर्भात सुरुवातीला आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया आल्या. त्यापुढे राजदशी हातमिळवणी केल्यानंतर नितीश कुमार यांच्यावर भाजपानं जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडण्याचं नेमकं कारण काय ठरलं? याविषयी तर्क लावले जाऊ लागले होते. यासंदर्भात आता खुद्द नितीश कुमार यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
“निवडणूक काळात त्यांचं (भाजपा) वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सगळ्यांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला”, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी २०१४मध्ये जिंकले, पण २०२४ मध्ये ते जिंकतील का?
नितीश कुमार यांनी भाजपाशी आघाडी तोडून राज्यात नवं सरकार स्थापन केल्यानंतर त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणारा विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून पाहिलं जाऊ लागलं होतं. २०२४मध्ये ते मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा रंगली होती. मात्र, पंतप्रधान पदाच्या उमेदवारीमध्ये आपल्याला रस नसल्याचं नितीश कुमार यावेळी म्हणाले.“२०२४ सालच्या कोणत्याही पदासाठी आमची दावेदारी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४मध्ये जिंकले, पण २०२४ मध्ये ते जिंकतील का?”, अशा शब्दांत नितीश कुमार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.