‘नरेंद्र मोदी विचार मंच’ चा महाराष्ट्रात विस्तार करणार : ईशा कोळेकर
पुणे :
‘नरेंद्र मोदी विचार मंच’च्या राष्ट्रीय पदाधिकारी आणि कार्यकर्ता संमेलन नुकतेच येथे संपन्न झाले . संमेलनाचे संयोजक आणि मंचच्या अल्पसंख्य विभागाचे अध्यक्ष शब्बीर टिंडालीया, महिला आघाडीच्या महासचिव ईशा कोळेकर-जैन यांनी आयोजन केले होते. हे संमेलन दत्तनगर बस-डेपोजवळ, कात्रज-देहू रोड महामार्ग येथे आयोजित करण्यात आले होते.
‘नरेंद्र मोदी विचार मंच’ चे मुख्य राष्ट्रीय महासचिव जे . पी . सिंग, राष्ट्रीय महासचिव नरेंद पांचाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद आगरवाल, महाराष्ट्र अध्यक्ष कार्यकारी सुहास माने, युवा आघाडी अध्यक्ष प्रमोद परदेशी, डॉ. विनोद जैन, प्रदीप शेवाळे, युवा आघाडी संपर्क प्रमुख अनंत कुलकर्णी,महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून, तसेच अमेरिका येथून पदाधिकारी उपस्थित होते.
संमेलनास भारतमातेचे पूजन करून, शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच राष्ट्रगीत म्हणून प्रारंभ झाला. पुणे शहर, जिल्हा, प्रदेश पातळीवरील पदाधिकार्यांना यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली. ईशा कोळेकर-जैन यांनी प्रास्ताविक केले. मेघना जुजम यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले तर शब्बीर टिंडालीया यांनी आभार मानले.
ईशा कोळेकर-जैन प्रास्ताविकात बोलताना म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्याचा प्रसार करणे हा मंच चा प्रमुख उद्देश असून, देशाला प्रगतीपथावर नेणार्या योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम हा मंच करणार आहे. महिलांचे ख-या अर्थाने सक्षमीकरण व सबलीकरण या मंचाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच महाराष्ट्रात मंचाचे विस्ताराचे कामही सर्वत्र चालू आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची चौफेर प्रगती झाली आहे.
जे. पी. सिंग म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत महासत्ता करण्यासाठी कृती कार्यक्रम आखून पुढे नेण्याचा मानस व्यक्त केला आहे. तो कार्यक्रम पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी मंचाची आहे.’