मुखेड-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय हे बुकी अनिल जयसिंघानी याच्या जागेवरच असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि अनिल जयसिंघानी यांचे संबंध काय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे यांची काल मुखेड येथे महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उल्हास नगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या, असेही अंधारे यांनी म्हटले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी हेही चर्चेत आले आहेत. फडणवीसांनी यासंदर्भात थेट विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली असून त्यावरून ठाकरे गटावरही आरोप करण्यात येत आहेत. यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नांदेडमधल्या सभेत बोलताना अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना श्रीकांत शिंदेंच्या उल्हासनगरमधील कार्यालयावरून प्रश्न विचारले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या, उल्हासनगरमध्ये गोल मैदाममध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तपासून पाहावे. ती जागा अनिल जयसिंघानीच्या नावावर आहे का, हे एकदा पाहावे. ज्या अनिल जयसिंघानियाच्या नावाने अनेक आरोप केले जातात, त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कसे? ती जागा कोणाची? कोणाच्या नावावर? खरेदी विक्रीची कागदपत्रे तपासा, असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या, काल संध्याकाळी व्हायरल झालेल्या फोटोत दिसत आहे की, अनिक्षा जयसिंघानीचे वडिल टॉप बुकी अनिल जयसिंघानी यांचा. 2015 मध्ये त्यांचे शिवसेनेत प्रवेश करण्याचे ठरले होते. हा माणूस मातोश्रीपर्यंत कसा येतो, याबाबत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणात त्यांनी हे आरोप केले आहेत.