मुंबई- राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात पक्ष कोणाचा याबाबत वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 9 मंत्र्यांसह 31 आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यामुळे अजित पवारांच्या गटात एकूण 40 आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे G-20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कार्यालय आज बंद आहे. पण तरीही एका मेलद्वारे शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल करण्यात आले आहे. मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. 9 मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातले 4 विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे.
शरद पवार गटाकडून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच आमदारांचा आकडा समोर आला आहे. 9 मंत्र्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती. मात्र आता 31 आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्याशिवाय यातले चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाकडून करण्यात आलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहे. अजित पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा, पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता तो शरद पवार गटाने फेटाळला आहे. 2022 मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याची देखील काही पुरावे देण्यात आल्याची माहिती आहे.
सुनिल तटकरे म्हणाले की, मी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. शरद पवार गटाने कितीही दावे फेटाळले तरी त्याने कोणताही फरक पडत नाही. कारण आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेताना सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास केला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, ते पाहता निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे,
आज पुण्यात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ‘जे आमच्यातून गेलेले आहेत त्यांचा दावा आपण पहिला असेल तर असंच दिसत कदाचित त्यांना निवडणूक आयोगाने कबुल केलेलं दिसत आहे की, पक्षचिन्ह आणि नाव त्यांच्याकडे जाणार. जर निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच झाला असेल तर सुप्रीम कोर्ट हाच त्याच्यावरचा उपाय आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच जर राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं तर महाराष्ट्राची जनता ते माफ करणार नाही, मोठ्या रोषाला भाजपला सामोरं जावं लागेल.’ जयंत पाटील यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह शरद पवारांच्या हातातून जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला होता त्याचप्रमाणे अजित पवार यांनी सुद्धा आम्हीच राष्ट्रवादी आहोत, असा दावा केला आहे. तसेच आपल्याला सर्वात जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. जर हे प्रकरण भविष्यात निवडणूक आयोगाकडे गेल्यास शिवसेना पक्षाप्रमाणेच निवडणूक आयोग वरील बाबी तपासू शकतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खरा अधिकार कुणाचा आहे, याचा निकाल देऊ शकतं. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव देखील शिवसेनेप्रमाणेच फुटीर गटाला मिळणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.