मुंबई, दि. ६ सप्टेंबर
काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली होती. ‘डरो मत,’ ‘नफरत छोडो, भारत जोडो’ चा संदेश देत गरिब, वंचित, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, व्यापारी, खेळाडू सर्व घटकांशी राहुलजी गांधी यांनी संवाद साधत देशातील वातावरण बदलून टाकले. कन्याकुमारी ते काश्मीर या ४ हजार किलोमीटर पदयात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उद्या दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे आयोजन केले आहे.
उद्या गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत पदयात्रा काढली जाणार आहे व त्यानंतर ६ ते ७ या वेळेत जाहीर सभा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपासून या भारत जोडो यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. त्याआधी दुपारी १ वाजता सर्व जिल्ह्यात काँग्रेसचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवून जनतेची कशी लूट केली याचा पर्दाफाश करणार आहेत.
देशातील जनता महागाईने त्रस्त आहे, सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले असतानाही मोदी सरकारला महागाई दिसत नाही. सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते पण मागील ९ वर्षात मोदी सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवू शकले नाही. ९ वर्ष जनतेची लूट केल्यानंतर आता त्यांना जनतेची आठवण झाली असून गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. गॅस स्वस्त केल्याचा भाजपा व मोदी सरकार मोठा गाजावाज करत आहे परंतु ते खरे नाही. मोदी सरकारने ९ वर्षात जनतेला कसे लुटले याची पोलखोल या पत्रकार परिषदांमधून केली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांवर जिल्हावार जबाबदारी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अहमदनगरमध्ये विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अकोलामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पुणे जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाणे येथे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान, नाशिकमध्ये CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, औरंगाबादमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूरमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, जळगावमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.