जळगाव-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात स्वाभिमानी सभांचा धडका लावला आहे. या अंतर्गत येवला, बीड नंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा होत आहे. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी ही तीन वाजता ही जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची ही पहिली सभा आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील या सभेच्या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे जळगाव जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. तसेच सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी व्हावी या पद्धतीने आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. त्यामुळे खासदार शरद पवार आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी, यासाठी नियोजन केले जात आहे. या सभेसाठी खासदार शरद पवार मुंबईहून जळगाव विमानतळावर येणार आहेत. तेथून ते मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यापुढील वेळ हा जैन हिल्स या ठिकाणी राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी दीड ते साडेचार वाजेपर्यंत खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्कवर सभा होईल. सभा संपल्यानंतर पाच वाजता ते जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील.