मुंबई/पुणे: राज्याच्या सत्तासंघर्षात शिंदे-फडणवीस सरकार टिकेल की नाही याचा निकाल सुप्रीम कोर्टाने लावला आहे. त्यामुळे आता काहीच दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.येत्या ७ जूनला मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सूत्रांकडून समजते आहे ,मात्र यावेळी पुण्याला मोठा धक्का बसेल असेही सांगण्यात येते आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले शिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंत्रीपद या विस्तारात जाण्याची आणि २४ च्या निवडणुकीत पाटलांना मेधा कुलकर्णी यांच्यासाठी कोथरुड विधानसभा मतदार संघ देखील सोडावा लागण्याची शक्यता राजकीय समीक्षकांनी नोंदविली आहे.यासाठी खुद्द पाटलांनी पूर्वी केलेल्या ‘मी पुन्हा कोल्हापूरला जाईल ‘ अशा वक्तव्याचा दाखलाही दिला जातो आहे. कोथरूड ची आमदारकी मिळाल्यावर पाटलांनी केलेली काही वक्तव्ये वादग्रस्त ठरली कोथरूड मध्ये मेधा कुलकर्णी वगळता अन्य कार्यकर्त्यांशी जुळवून घेतले ,पण महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर लगाम ते घालू शकलेले नाही यामुळेच कसबा भाजपकडून निसटल्याचा सूत्रांचा दावा आहे.आणि जिल्ह्यात शिंदे गटाचा एकही आमदार नाही तर भाजपचे आठ आमदार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजप मंत्रिपदासाठी कोणाला संधी देणार यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पुण्याला या मंत्रिमंडळ विस्तारात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र दोन मंत्रिपदासाठी पुण्यातील तीन मातब्बर आमदारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.यामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू राहुल कुल यांचे नावं चर्चेत आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता या तिघांपैकी दोघांना संधी देऊन शहरी आणि ग्रामीण समतोल राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या पुण्याला फक्त चंद्रकांत पाटील यांच्या रूपात एकच मंत्रिपद आहे.दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री पद आणि दोन मंत्रिपद होते. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीची घोडदौड थोपवण्यासाठी शिंदे-फडणवीस कोणाला संधी देतात याकडे पाहणे महत्वाचे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर धुरा सोपवली जाऊ शकते. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि फडणवीसांचा मंत्रिमंडावरील होल्ड पाहता राहुल कुल यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. तर पर्वती मतदारसंघातून सलग तीन वेळेस आमदार असणाऱ्या माधुरी मिसाळ यांचा देखील या विस्तारात विचार होण्याची शक्यता आहे.
स्वरदा बापट,प्रवीण गायकवाड यांची वर्णी लागणेही कठीण
दरम्यान लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे स्वरदा बापट आणि महाविकास आघाडी तर्फे प्रवीण गायकवाड यांची नावे घेण्यात येत असली तरी सूत्रांचा दावा आहे कि या दोहोंनाही उमेदवारी मिळणे कठीण आहे . स्वरदा बापटांना कसबा विधानसभा मतदार संघच सांभाळायला सांगितले जाईल आणि महाविकास आघाडी झालीच तर कॉंग्रेसला जागा दिली जाईल मात्र राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांचा कॉंग्रेस प्रवेश घडवून मानकर यांना मविआ लोकसभेला उभे करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे २०२४ मध्ये कसब्यात रवी धंगेकर यांना स्वरदा बापट यांच्याशी लढत देणे अवघड होईल आणि लोकसभेसाठी भाजपा नेमका कोणाला उमेदवारी देईल हे मात्र शेवटपर्यंत गुपितच राखले जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.