पिंपरी- वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावू नयेत, असे मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केले होते. पण, कार्यकर्त्यांनी लावलेत. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आयुक्त, महापौर, शहराचे कामकाज ज्यांच्या हातात आहे. त्यांनी कारवाई करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरभर शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. पवार आज (बुधवारी) खासगी दौऱ्यानिमित्त शहरात आले होते. तुमच्या वाढदिवसानिमित्त काही गुन्हेगारांनीही फलक लावले असल्याचे काही माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, मी सांगितले काय त्यांना ? मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरुन फ्लेक्स लावू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. उद्याच्याला कोणी काय केले. आणि ते चुकीचे असेल. तर, पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी नाही.मी पिंपरी-चिंचवडमध्ये आज नाही, अनेक वर्षे येत आहे. पिंपरी-चिंचवडकरांना माझी मते स्पष्टपणे माहिती आहेत. अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितले नाही. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील. तर, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आयुक्त, महापौर, शहराचे कामकाज ज्यांच्या हातात आहे. त्यांनी कारवाई करावी, असे पवार म्हणाले.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 9 जुलै रोजी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवायचा या जिद्दीने शिवसैनिक कामाला लागलेत. आगामी निवडणुकीत 50 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट असून त्याद्वारे शहराचा महापौर शिवसेनेचाच करण्याचा निर्धार त्यांनी केला.याबाबत माध्यमांनी विचारले असता पवार म्हणाले, ‘कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते शहरात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढावे. ईर्ष्या निर्माण व्हावी. कार्यकर्ते कामाला लागावेत. यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करणारच, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळीचे अशी वक्तव्ये करणार, आणखीन कोणती आघाडी असेल. तर, तेही करणार, प्रत्येकजण आपल्या-आपल्या परीने बोलतात. आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काय वक्तव्ये करायचे हा त्यांचा अधिकार आहे’.