मुंबई – ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकासआघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली. या बैठकीत आघाडीतल्या मित्रपक्षांसह 3 पक्षांची महाविकासआघाडीत एकमताने सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान या बैठकीत महाविकासआघाडीचे ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ असे नामकरण करण्यात आले. तत्पूर्वी बैठकीच्या सुरुवातीला 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सुप्रीम कोर्टाने संविधान दिनाच्या दिलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 1 डिसेंबर रोजी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेस बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. आजवर राजकारणात ‘रिमोट कंट्रोल’ची भूमिका निभावणाऱ्या ठाकरे घराण्याच्या हाती आता राज्याचा कारभार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे