मुंबई -तुम्ही ईडी लावा, मी सीडी लावतो म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेऊन भाजपा सोडून राष्ट्रवादी त गेलेल्या एकनाथ खडसे यांना ईडी ने चहु बाजूने घेरले आहे, आता सीडी कधी बाहेर येणार ,आणि राष्ट्रवादी खडसे यांना कसे संरक्षण देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे .
भोसरीतील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ता. ८ जुलै रोजी काल तब्बल नऊ तास चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी न बोलता खडसे हे आपल्या निवास स्थानाकडे रवाना झाले. दरम्यान, भोसरीतील जमीन व्यवहारासंदर्भातील आणखी काही कागदपत्रे येत्या दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत, असे खडसे यांच्या वकिलानी माहिती दिली.
भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. परवा रात्रभर त्याची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली होती. काल सकाळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने काल खडसे यांना समन्स बजावले होते. सकाळी ईडीच्या कार्यालयात जाताना ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार, असे खडसेंनी सांगितले होते.खडसे यांनी चौकशीच्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे. भोसरीतील जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे येत्या दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. ज्यावेळी चौकशीची गरज भासेल, त्यावेळी आम्ही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात येऊ, असे खडसेंच्या वतीने सांगण्यात आले आहे. यापुढे चौकशीसाठी कधी यायचे, हे आता सांगितलेले नाही. या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे खडसे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलाने माध्यमाशी बोलताना नमूद केले.
काय आहे भोसरी भूखंड प्रकरण?
2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री होते.
त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52 /2अ /2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केला.
हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अकानी नामक या व्यक्तीकडून खरेदी केला होता. पण या भूखंडाचा सातबारा ‘एमआयडीसी’ च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौकशी आणि अकानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. परंतु 2018 एकनाथ खडसे यांना क्लिन चिट देण्यात आली.
दरम्यान, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीसाठी झोटींग कमिटीची स्थापन करण्यात आली. या समितीमार्फतही प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.”भोसरी भूखंड खरेदीची याआधी पाच वेळा चौकशी झालेली आहे.