- भाजपकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे दावेदार
- 4 दिवसांत शपथविधी होणार – सुधीर मुनगंटीवार
मुंबई-देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अनुमोदन दिले. याद्वारे आता भाजपाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावेळी ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे कारभार सांभाळला. गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना त्यांनी अनेक प्रश्न खुबीनं सोडवले. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे येऊ शकत नाही.” या प्रस्तावाला भाजपाच्या १२ आमदारांनी अनुमोदन दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य करू -फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजप विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्यानंतर आमदारांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. सोबतच, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे राज्य करू असे म्हटले होते. हे सरकार पुढील पाच वर्षे चालणार असा दावा सुद्धा फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला आहे.
विधिमंडळाच्या बैठकीत पंकजा मुंडेंचाही समावेश
परळी विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांनी देखील विधिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. त्यातच त्यांनी विधिमंडळाच्या बैठकीत उपस्थिती लावून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात केली. त्यांना विधान परिषदेवर नियुक्ती देऊन मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बुधवारी बैठक अपेक्षित होती. परंतु, ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. एका मराठी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी बुधवारी दुपारी फोनवर चर्चा केली. दोघांनीही लवकरच भेटून तोडगा काढण्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेकडून गुरुवारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेचा विधीमंडळातील नेत्याची निवड केली जाणार आहे.
शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदे; भाजपची ‘ऑफर’
मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना आग्रही असतानाच, भाजपनं शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदे देण्याबाबतचा प्रस्ताव भाजपनं ठेवला असल्याचं कळतं. तर मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदं ही भाजपकडेच राहतील, असंही समजतं. भाजपच्या या ‘ऑफर’नंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.