नवी दिल्ली : लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी के. सी. पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाळासाहेब थोरात यांची निवड प्रदेशाध्यक्षपदी केली जाईल याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर आता पक्षाकडून हे निश्चित करण्यात आले आहे. थोरात यांच्यासोबत राज्यात पाच कार्यकारी अध्यक्षांची नियुक्तीही करण्यात आली आहे. यामध्ये युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम, नितीन राऊत, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी के. सी. पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मान्यता दिल्यानंतर संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी या सर्व नियुक्त्या जाहीर केल्या.