पुणे – काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक या पुणे शहराला विकासापासून दूर ठेवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेताच राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला.
हडपसर मतदार संघातील प्रभाग क्रमांक 41 येथील आमदार योगेश टिळेकर यांच्या मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. कोंढवा बु.|| येथील शत्रूंजय मंदिराजवळ हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. मुख्यंमंत्र्यांनीही आज पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मागील 7 ते 8 वर्षांपासून मेट्रोविषयी फक्त ऐकतच आलो होतो. पण मेट्रो काही आलीच नाही. परंतु आम्ही सत्तेवर येताच 2 वर्षात हा प्रकल्प मार्गी लावला. येत्या 24 तारखेला मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित शहरात कितीही रस्ते असले, कितीही उड्डाणपूल असले तरी वाहतुकीची समस्या सुटेलच असे नाही. त्यामुळे शहरी भागात मेट्रो गरजेची आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
सर्वसामान्य माणसाला घर दिल्याशिवाय स्वातंत्र्याचं मोल मिळत नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्व भारतीयांना घर देण्याचे ठरवले आहे. परंतु असे असले तरी आम्ही 2022 पर्यंत वाट न पाहता महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातील नागरिकांना 2019 सालापर्यंतच साडेचार लाखात घर देणार आहोत. त्याची सुरुवातही झाली असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील 2 लाख घरासाठी मंजुरी दिली आहे.