मुंबई–शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. देशभरात सध्या विरोधकांची दडपशाही सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांची गेल्या 9 तासांपासून चौकशी सुरु आहे. त्यावर शिवसेनाप्उरमुखद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यातील शिवसैनिकांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे राजन विचारे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
देशात दमनशाहीचे राज्य
उद्धव ठाकरे म्हणाले, देशभरात सध्या दमनशाहीचे राज्य सुरू आहे. सत्तेसाठी निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे. विरोधकांविरोधात कटकारस्थाने रचली जात आहे. संजय राऊत यांनादेखील अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, हिंदुत्वाबाबत शिवसेना कधीही तडजोड करणार नाही. हिंदुत्वासाठी शिवसेना कायम लढत राहिल.
ठाण्याचा बालेकिल्ला शिवसेनेचाच
ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी अद्याप शिंदे गटासोबत जाणार की उद्धव ठाकरेंसोबत राहणार हे स्पष्ट केले नव्हते. आज प्रथमच त्यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण ठाकरेंसोबतच असल्याचे जाहीर केले. यावेळी राजन विचारे म्हणाले, ठाण्याचा बालेकिल्ला हा शिवसेनेचाच असून तो आणखी मजबूत करणार आहोत. ठाणे आणि शिवसेनेचे मजबूत असे नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मातोश्रीवर आल्याचे त्यांनी सांगितले.