मुंबई–काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली आणि आज सकाळीच खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे.ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच संजय राऊतांच्या घरी दाखल झाले. या अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला आहे. ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र त्यानंतर आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या कुुटुंबीयांसमवेत संजय राऊत घरी असून अनेक प्रकरणात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असे ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी म्हटले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान 4 टविट केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर ईडीचे पथक सकाळी 7 वाजताच दाखल झाले. सकाळीच ईडीकडून संजय राऊतांवर कारवाई सत्र सुरू झाल्याचे समोर आले आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची चौकशी होणार असल्याची शक्यता आहे. केंद्रीय सुरक्षा रक्षकांचे पथक भांडुपमधील मैत्री बंगल्याचा बाहेर उपस्थित असल्याची माहिती आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र तपासण्याचे काम सुरू आहे.
संजय राऊत सहकार्य करत नाही असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगत आजच्या रेडसाठी दिल्लीतून परवानगी देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याकडून प्रश्नाची उत्तरे मिळावी यासाठी ईडीचे पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झाले आहे.पुढचे काही तास ही कारवाई सुरू राहणार असून राऊतांच्या पत्नींचीही चौकशी होईल, कारण त्यांच्या बँकेच्या खात्यातून पैश्याची देवान घेवान झाली आहे. यामुळे त्यांचीही चौकशी होणार असून संजय राऊत यांना दुपारी ईडी कार्यालयात ही नेले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.