पुण्यात सेनेला जागा नाही -या अट्टाहासाने होणार नुकसान ..?
पुणे- आठ हि आमदार आमचेच आहेत विद्यमान आमदारांच्या जागा सोडू शकणार नाही ,त्यामुळे सेनेला पुण्यातून 1 हि जागा देणार नाही,असे सांगत प्रत्येक आमदार माझी उमेदवारी पक्की असे सांगत आहेत … तर सेनेला जागा द्यायचा संबधच नाही असा पुण्यातील भाजपच्या नेत्यांचा दावा म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्याचे काम असल्याचा आरोप सेनेच्या वर्तुळातून होतो आहे .विद्यमान आमदारांपैकी किती आमदारांची कामगिरी समाधानकारक आहे हे भाजपची यादी जाहीर होताच बदललेले चेहरे स्पष्ट करतील .राज्यात युती झाली तरी भाजपच्या स्थानिक अट्टाहासापायी पुण्यात युती -मनोमिलन होणे कठीण दिसते आहे. हडपसर ,खडकवासला ,शिवाजीनगर आणि वडगाव शेरी अशी 4 मतदार संघातून सेनेची मागणी होत असताना नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदार संघ मागून ५ व्या मतदार संघाची मागणी नोंदविली आहे.
८ पैकी 1 आमदार खासदार झाल्याने विद्यमान ७ चेहरे भाजप मध्ये आहेत या ७ पैकी हडपसर सेनेला देवून इथला चेहरा बदलावाच लागेल अन्यथा येथूनच युतीला घरघर लागेल आणि पुण्यातील संख्याबळाला ग्रहण लागेल असे म्हटले जाते. हडपसरच्या विद्यमान आमदारांची कारकीर्द वादग्रस्त अशी राहिली आहे त्यावर पडदा टाकण्यासाठी इथली जागा सेनेला देणे महत्वाचे ठरणार आहे .सेनेचे इथले माजी आमदार महादेव बाबर पराभवानंतर काही काळ अलिप्त पडल्याचे दिसले होते .पण तेथूनच नाना भानगिरे यांनी अव्याहतपणे सुरु ठेवलेली संपर्काची मोहीम आणि कसलेली कंबर पाहता राष्ट्रवादी ला खंबीर लढत देनाऱ्या युतीतील कार्यकर्त्याच्या विजयाची संधी हुकवू नये असे सेनेच्या गोटातून आग्रहाने सांगितले जाते आहे. सेनेकडून शिवाजीनगर मधून भानुप्रताप बर्गे, विनायक निम्हण अशी नावे घेतली जात आहेत तर भाजप मधून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरोळे ,बापट यांचे निकटवर्तीय पत्रकार सुनील माने अशा नावात रस्सीखेच आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातून चेहरा बदल ठरलेलाच असे चित्र असताना आयत्यावेळी मुख्यमंत्री हे ,’राज्यसभा सद्स्य असलेल्या संजय काकडे यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही येथे लढण्याचे आदेश देवू शकतात असे सांगितले जाते आहे .
कँटोमेंट मतदार संघातून चेहरा बदल संभवतो आहे असा दावा भाजपवासी च करताना आढळत आहेत . आता येथून विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना उमेदवारी मिळणार कि अन्य कुठल्या नव्या तरुण चेहऱ्याला संधी मिळणार याकडे या मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. खडकवासला मतदार संघातून विद्यमान आमदार यांच्या विषयी मोठी नाराजी आहेच . फक्त वडगाव शेरी मतदार संघातील जगदीश मुळीक यांची उमेदवारी जास्त सेफ मानली जाते. अगदी तरुण असलेल्या मुळीक यांच्या कारभाराविषयी थेट अशा फारश्या तक्रारी नसल्याने आणि महापालिकेत गटनेता पद भूषविलेल्या येथील सेनेच्या इच्छुकाने कितीही मेळावे भरविले तरी मुळीक यांच्यासारख्या निष्कलंक,तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देईल असे भाजपच्या कार्यकर्त्यांच म्हणणे आहे .
कसबा विधानसभा मतदार संघ गिरीश बापट यांच्या खासदार होण्याने रिक्त झाला आहे. मात्र तो भाजपचा अभेद्य असा किला आहे असा दावा करत येथून महापौर असलेल्या मुक्ता टिळकांना संधी देण्यात येईल असे बोलले जाते आहे. अर्थात त्यांना तेथून सेनेचे सहाय्य मिळेल काय ? त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचा उमेदवार कोण असेल , आणि महापौर कारकिर्दीतील काही घडामोडी ,काही क्रिया आणि कारभार बालेकिल्ल्याला धडका देनाऱ्या ठरतील कि मजबूत करतील यावर हि राजकीय गोटात मंथन होताना दिसते आहे .