..तर कोथरूडमधून चंद्रकांत दादा लढतील …. निर्वाणीचा इशारा ?
पुणे-चेहरे तर बदलणार,पण किती ,आणि कोण कोणते चेहरे भाजप पुण्याच्या आठ विधानसभा मतदार संघात बदलणार यावर राजकीय चर्चेला उधाण आले असताना ,कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना ,महापालिकेत भाजपने २ अर्थसंकल्प सादर करण्याची ‘डबल धमाका ‘ संधी उपलब्ध करून दिलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी दिलेले रस्सीखेच आव्हान आणि त्यातून उठलेली धुळवड पाहता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वो असलेले नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोथरूड मधून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना लढविता येईल काय ? याबाबत चाचपणी केल्याचे म्हणणे काही सूत्रांनी मांडले आहे . मेधा कुलकर्णी.मुरलीधर मोहोळ, संदीप खर्डेकर,मंजुश्री खर्डेकर ,अमोल बालवडकर,शामराव सातपुते,सुशील मेंगडे,निलेश निधाळकर,विशाल गंधिले,योगेश राजपुरकर,राहुल कोकाटेअशी मंडळी येथून इच्छुक असताना प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठरविले तर येथून थेट चंद्रकांत दादा पाटील लढतील असे सांगितले जाते आहे .
कोथरूड विधानसभा मतदार संघ हा भाजप साठी अत्यंत सुरक्षित असा मतदार संघ मानला जातो त्यानुळे येथून विजयाची हमी अनेकांना असते . अर्थात इथले प्रमुख आव्हान ठरणारे राष्ट्रवादी चे दीपक मानकर नावाचे वादळ शमविल्यानंतर या मतदार संघावर अनेकांचा डोळा आहे. आणि महापालिकेत २ अर्थसंकल्प सादर करण्याची ‘डबल धमाका ‘ संधी मिळालेले मोहोळ या नामी संधीच्या प्रतीक्षेत होतेच . मेधा कुलकर्णी यांचे कार्य आणि जनहितासाठी थेट लढत देण्याची वृत्ती आता त्यांच्या नामी संधी ला आड येते आहे. कदाचित याच कारणाने फ्लेक्स वॉर झाले ,आडवे तिडवे फ्लेक्स लावून एकमेकांना शह देण्याचे प्रकार झाले. मोहोळ बुद्धिमान असे शक्तिमान आहेत तर कुलकर्णी बुद्धिमान अशा युक्तीमान आहेत. या दोहोतील हि स्पर्धा पक्षाला वेगळ्या वादळात खेचू पहाते आहे आणि यामुळे या दोघांच्यातील या राजयुद्धाचा फायदा खर्डेकर किंवा सातपुते यांच्यासारख्या ज्येष्ठ जुन्या कार्यकर्त्यांना होणे गरजेचे असताना आता येथे कोल्हापूरचे चंद्रकांत दादा पाटील यांना पाठवून कोथरूडची मक्तेदारी मुख्यमंत्री संपुष्टात आणू पाहत आहेत असे सांगितले जाते आहे. अर्थात उमेदवारी घोषित होण्यापूर्वीची हि वादळे नेमका निवडणुकीच्या मैदानात कोणता आणि कसा रंग भरतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.