पुणे – पीएमपीएमएल कडून आज १ फेब्रुवारी पासून मार्ग क्रमांक २१८ हडपसर ते वीर गाव हा नवीन बस मार्ग
सुरू करण्यात आला. वीर गाव येथे श्रीनाथ म्हस्कोबा हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी
येत असतात. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या हस्ते श्रीनाथ
म्हस्कोबा मंदिराच्या प्रांगणात या बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. फुलांची आकर्षक सजावट केलेली पीएमपीएमएल
ची बस सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वीर गाव ते सासवड दरम्यान फटाके वाजवून व ढोलताशांच्या गजरात ग्रामस्थांनी
बससेवेचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.
याप्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, सचिव अभिजीत धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, सरपंच माऊली वचकल,पीएमपीएमएलचे हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड, असिस्टंट डेपो मॅनेजर मोहन दडस, पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन बँकेचे संचालक सुनिल पोमण, महादेव पोमण, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.मार्ग क्रमांक २१८ – हडपसर ते वीर गाव या बससेवेचा मार्ग हडपसर, भेकराईनगर, देवाची उरुळी फाटा,वडकीनाला,झेंडेवाडी, दिवे, पवारवाडी, सासवड, पिंपळे पोमणनगर, पांगारे, यादववाडी, परींचे, वीर गाव असा असणार आहे.
याप्रसंगी बोलताना पीएमपीएमएल चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले,”हडपसर ते वीर गाव या बससेवेसाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी विशेष प्रयत्न केले. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट व वीर पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींनी पाठपुरावा केला. सध्या या बसमार्गावर ३ बसेसद्वारे बससेवा उपलब्ध आहे. सासवडहून साधारणपणे दर ५० मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. हडपसर ते वीर १२ खेपा व सासवड ते वीर १६ खेपा होणार आहेत. या परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांच्यासह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.”
हडपसर ते वीर गाव पहिली बस सकाळी ५.३५ वा. तर शेवटची बस संध्याकाळी ७.५० वा. आहे. तसेच वीर गाव ते
हडपसर पहिली बस सकाळी ६.३० तर शेवटची बस संध्याकाळी ७.३५ वा. आहे. तसेच सासवड ते वीर पहिली बस सकाळी
६.३० वा. आणि शेवटची बस संध्याकाळी ८.४० वा. आहे.
सदरची बस सेवा सुरू झाल्यामुळे वीर, परिंचे, पांगारे, पिंपळे पोमणनगर, यादववाडी तसेच वीर ते सासवड दरम्यान
असणाऱ्या गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून आम्हाला या बस सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.

