पुणे शिवाजीनगर येथील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण

Date:

पुणे, दि.23 – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  उभारण्यात आलेल्या  कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, दीपाली डिझाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक विनय मित्तल उपस्थित होते.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा.सुप्रियाताई सुळे, खा.श्रीरंग बारणे, आ.चंद्रकांत पाटील, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात, श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहे, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच कोणीही गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घेणे आवश्यक आहे तसेच मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितलेमुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्सासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगून पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे, त्यामुळेच पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. या रुग्णालयात मंगळवार सायंकाळपासून रुगणसेवा देण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाचा उल्लेख करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जम्बो सुविधेमुळे बेड उपलब्धता वाढणार असून कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थिती आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.कार्यक्रमात जम्बो कोविड रूग्णालयाची उभारणीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आभार सुहास दिवसे यांनी मानले.

रुग्णालयाविषयी – पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 800 खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर हे 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात 600 खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयू साठी स्वतंत्रपणे राखीव असतील. एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये असलेल्या सर्व सोयी सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टर या कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सुद्धा आहेत. संपूर्ण परिसर, ज्यामध्ये व्यवस्थापन केंद्र, प्रयोगशाळा, औषध केंद्र, डॉक्टरांसाठी विश्रामगृह, उपहारगृह, रुग्ण येण्याचे ठिकाण, वाहनतळ इत्यादी सोयी सुविधा आहेत तसेच या दिव्यांगाच्या दृष्टीने सुद्धा सुखकर करण्यात आल्या आहेत. लिक्विड ऑक्सिजन टाकी तसेच राखीव ऑक्सीजन सिलेंडर यामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. ऑक्सीजनयुक्त सहाशे खाटांच्या संपूर्ण वातानुकूलित विभागामुळे हा देशातील सगळ्यात मोठ्या रुग्णालयात पैकी एक बनला आहे. कमी दाबाने वातानुकूलित करण्यात आलेल्या आयसीयूमुळे या विभागात कायम शुद्ध व स्वच्छ हवा खेळती राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. रुग्ण तसेच भेट द्यायला येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर रेड व ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आला आहे.  पुण्यात सरासरीच्या 70 टक्के पर्जन्यमान या दरम्यान होत असल्याने हे रुग्णालय जलरोधक व ताशी 125 किलोमीटर वाऱ्याचा वेग सुद्धा सहन करू शकेल इतके भक्कम बनवण्यात आले आहे.

गेल्या 18 दिवसात जरी सातत्याने पाऊस होत होता तरी हे रुग्णालय वेळेत व सुसज्ज असे बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळेच कुठल्याही वातावरणात रुग्णालय पुढील सहा महिने भक्कम उभे राहील याची खात्री देता येईल.  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच पुण्यातील इतर शासकीय आस्थापनांच्या सहकार्याने हे रुग्णालय उभे राहिले आहे. येणाऱ्या काळात हे रुग्णालय देशात उभे राहणाऱ्या कोविड रुग्णालयांसाठी मानक म्हणून पुढे येईल, अशी खात्री आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...