पुणे- भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या कौतुक सोहळ्यात गुन्हेगारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांना आज महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर आणि भाजपाचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी जोरदार टोला लगाविला आहे , आपल्या सत्तेत गृहमंत्र्यालाच फरार होण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादीच्या अनेकांना मोका लागला आहे . अशा पद्धतीने आपल्याच पक्षात डोकावून पाहून जगतापांनी त्याबद्दल स्पष्टीकरणे द्यावीत ,असे बिडकर आणि खर्डेकर यांनी म्हटले आहे. काल राष्ट्रवादीच्या जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे गुंडगिरीला बळ देऊन पुण्याची संस्कृती बिघडवू पाहत असल्याची जहरी टीका केली होती . त्यास महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर आणि संदीप खर्डेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे कि, गुन्हेगार पुरुषांच्या घरातील स्त्रियांना गुन्हेगार मानने योग्य होणार नसतेच मात्र आमच्या भाजपच्या व्यासपीठावर कोणालाही पक्ष प्रवेश देण्यात आलेला नाही.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या फोटो बायोग्राफी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना शुभेछ्या द्यायला आले असंख्य लोकांना , महिलांना माघारी जा असे आम्ही म्हणू शकत नाही . पाया खालची वाळू सरकल्याने सातत्याने खोटे बोलून चंद्रकांतदादा यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम जगताप यांनी लावला आहे . आधी त्यांनी आपल्या खाली किती अंधार आहे त्याची चाचपणी करावी . आपल्या पक्षात गुन्हेगारांना स्थान दिले जाते , भाजपमध्ये नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे असेही बिडकर आणि खर्डेकर म्हणाले.
महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही राजकारणी आणि गुन्हेगार संबंध असा विषय पुढे आल्यावर एकमुखाने कोणाचे नाव पुढे येते, याचा उच्चार करण्याची गरज नाही. गुन्हेगारांचे राजकारण्यांशी संबंध हा विषय काय, हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगत. त्यांच्या समकालीन नेत्यांशी बोलल्यास जगताप यांना खूप तपशिलाने माहिती मिळेल. नरसिंह राव पंतप्रधान असताना ‘व्होरा समिती’ने गुन्हेगार आणि राजकारणी संबंध यावर अहवाल तयार केला होता, तोही प्रशांत जगताप यांनी नजरेखालून घालावा. पुण्याचाच विचार करायचा तर राष्ट्रवादीचे दोन विद्यमान लोकप्रतिनिधी ‘मोका’ कायद्याखाली तुरुंगाची हवा खाऊन आलेले आहेत. यातील एकाचे तर मार्गदर्शन सकाळ-संध्याकाळ जगताप घेत आहेत. त्यांना रोज बरोबर घेऊन फिरताना जगताप यांना कोणता संत्संग घडतो आहे, असा सवाल सभागृह नेते बिडकर यांनी विचारला आहे. जगताप यांच्या पक्षाचे गृहमंत्री या राज्याला लाभले होते, ते अनिल देशमुख १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणानंतर फरार आहेत. त्यांच्याविषयी जगतापांना काहीच बोलायचे नाही का? आपला पक्ष जनतेच्या मनातील सर्वात भ्रष्ट, गुंडांचा अशी प्रतिमा असताना जगताप जेव्हा संस्कृतीच्या गोष्टी करतात, तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करावेसे वाटते.
महिलांना समान संधी देण्यात राष्ट्रवादी अग्रेसर असल्याचा दावा केला जातो, पण दोन महिला चंद्रकांतदादांना आमदारकीची दोन वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने सदिच्छा द्यायला आल्याबरोबर त्या महिलांच्या बदनामीची मोहीम जगताप उघडतात, हे त्यांच्यातील पोकळ समतावादी दृष्टिकोनाचे दर्शन आहे. या महिलांचे भाऊ, पती काय करतात यावरून त्यांना बदनाम करणे, हा त्या महिलांवरील अन्याय आहे. या युगात महिलांना स्वतःची मते आहेत, स्वातंत्र्य आहे. असे असताना महिलांना केवळ त्यांच्या नातलग पुरुषांच्या प्रतिमेवरून जोखणे, हे महापौर राहिलेल्या जगताप यांना शोभत नाही. या महिलांना नव्याने काही सुरुवात करायची असेल, तर संधी नाकारणारे जगताप कोण? यातून जगताप यांचा महिलांप्रतिचा संकुचित दृष्टिकोन अधोरेखित होतो आहे. आधार देणारा, ज्याच्याकडे विश्वासाने जावे, अशा सहृदयी व्यक्तीला प्रेमाने ‘दादा’ या नावाने संबोधले जाते. चंद्रकांतदादांमधील दादा हा सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा दादा आहे. अन्यथा पुण्यातील जनतेला ‘दादा’ नावाची ओळख काय होती, हे तुम्हीच अधिक अधिकारवाणीने सांगू शकतात, असा टोला देखील बिडकर यांनी लगावला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वतःच्या पक्षात असलेल्या गुन्हेगारांकडे लक्ष द्यावे. खोटे आरोप करताना जगताप त्यांच्या पक्षाच्या इतिहासाचे, पक्षाच्या नेत्यांच्या भूतकाळाचेही विस्मरण झालेले दिसते.
गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका