बंगळुरू–केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नुकतीच फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीने गडकरींकडे तब्ल 100 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास केला. त्यात गडकरींना कर्नाटकच्या बेळगावातील हिंडलगा तुरुंगातून धमकावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लागलीच कर्नाटक पोलिसांनी हिंडलगा तुरुंगाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी गडकरींना धमकी देणाऱ्या कैद्याची चौकशी केली. तुरुंगातही दहशत अधिकाऱ्यांना नेहमीच धमक्या देऊन त्यांचा छळ करणाऱ्या आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याने आपली ओळख कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून करवून दिली. आपले नाव जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी असे सांगितले. महाराष्ट्र पोलिसांचे एक पथकही या प्रकरणी बेळगावला पोहोचले आहे.
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्याचा रहिवासी असणारा जयेश दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहे. हे हत्याकांड 2 ऑगस्ट 2008 रोजी घडले होते. पुजारीने जी महिला व तिच्या मुलाला संपवले ते जयेशचा चुलत भाऊ लोहितची पत्नी सौम्या (23) व मुलगा जिष्णू होते. जयेशने त्यांची हत्या शिराडीच्या सिरीबगीलु पोलिट्टु स्थित त्यांच्या घरी केली होती. त्याने सौम्याचा गळा घोटला. तर जिष्णुची चाकू भोसकून हत्या केली. घटनास्थळावरून पसार होण्यापूर्वी जयेशने सौम्याची चेन व झुमकेही नेले होते.जयेश 2012 पर्यंत फरार होता. त्यानंतर केरळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याला एका प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते. तेथून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण सतर्क नागरिकांनी त्याला पुत्तूर न्यायालय परिसरात पकडले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ऑगस्ट 2016 मध्ये जयेशला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘जयेशने तुरुंगातून अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. 2016 मध्येही त्याने एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडण्यात यश आले.’ जयेश पुजारी एक कुख्यात गुंड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याचे अंडरवर्ल्डसह महाराष्ट्रातीलही अनेकांशी संबंध आहेत..तुरुंग अधीक्षक कृष्ण कुमार यांनी काही माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार त्याला (जयेश पुजारी) त्याच्या या कृत्याप्रकरणी स्वतंत्र बराकीत ठेवले आहे. त्याच्यावर करडी नजरही ठेवली जाते. तुरुंगात तो सर्वच अधिकाऱ्यांवर ओरडतो. त्यांना धमकावतो. सद्यस्थितीत तुरुंगातील मोबाइल फ्रीक्वेंसी बंद करण्यासाठी तुरुंग परिसरात जॅमर लावले जात आहेत.’
तुरुंगातून धमकीचे फोन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही
हिंडलगा तुरुंगातून धमकीचे फोन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2013 मध्ये मुंबईतील युसूफ बच्चन नामक एका गुन्हेगारानेही आपल्या सहकाऱ्यांना तुरुंगातून फोन केला होता. त्याच्या इशाऱ्यानुसार मुंबईतील एका बिल्डरला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने तुरुंगातील अशा काळ्या कारवाया रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. पण सद्यस्थिती पाहता सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून होत आहे.नितीन गडकरींना धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारीची कसून चौकशी केली जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुजारीने तुरुंगातून मोबाइलद्वारे फोन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वातील नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथकही बेळगावला पोहोचले आहे. या पथकाने तुरुंग प्रशासनाकडे पुजारीची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे.